>> मकरंद मुळे
थोर पुरुषांचे जीवन शब्दबद्ध करणारे तृप्तीची तीर्थोदके डॉ. पांडुरंग किनरे यांनी लिहिलेले पुस्तक दीनदयाळ प्रेरणा केंद्रातर्फे प्रकाशित झाले. राष्ट्रहिताचे चिंतन करणाऱया व्यक्तींवरील हे पुस्तक बुधवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील सहयोग मंदिर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. चौदा व्यक्तिचित्रं आणि एक वैचारिक लेख असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
भवितव्याचे शिल्प घडविणारे सदैव स्मरणात राहतात. आपलं अवघं जीवन अंत्योदयासाठी समर्पित करणारे इतिहास घडवतात. प्रश्नांची केवळ चर्चा न करता ते सोडविण्यासाठी प्रत्यक्ष काम करतात. अन्यायाविरुद्ध तीव्र संघर्ष करतात. समरस समाजाच्या मनोवृतीसाठी टीका सहन करून विषमतेचा चक्रव्यूह भेदून टाकतात. विवेकाची पेरणी करण्यासाठी समाजमनाची मशागत करतात. विधायकतेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी मीपण बाजूला ठेवतात. अशा व्यक्ती ही समाजाची संपत्ती असतात. राष्ट्र प्रथम मानून आयुष्य खर्ची घालणाऱया व्यक्तींच्या कार्याचा आढावा आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘तृप्तीची तीर्थोदके’ हे पुस्तक डॉ. पांडुरंग किनरे यांनी लिहिले आहे.
या पुस्तकात त्यांनी दादाभाई नवरोजी, संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्येष्ठ कामगार नेते बगाराम तुळपुळे, रा.स्व. संघाचे संस्थापक-पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार, संघाचे दुसरे संघचालक गोळवळकर गुरुजी, तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, एकात्म मानवदर्शनचे उद्गाते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जनसंघाचे प्रेमजीभाई असर, राष्ट्रीय विद्यार्थी चळवळीचे शिल्पकार प्रा. यशवंत केळकर, रा.स्व. संघाचे प्रचारक नाना पालकर, सुरेशराव केतकर, मुकुंदराव पणशीकर आणि उत्तन येथील केशवसृष्टी प्रकल्पाच्या उभारणीतील प्रमुख कार्यकर्ते जनार्दन नलावडे यांचे कार्य शब्दबद्ध केले आहे. सोप्या भाषेत डॉ. किनरे यांनी ही समाजाशी एकरूप झालेली माणसं चित्रित केली आहेत. या व्यक्तींविषयी वाचताना सामाजिक-राजकीय संदर्भाचे धागेदोरे उलगडले जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष, या संघर्षात जपलेली देशभक्ती, पाकिस्तान आणि मार्क्सवाद याविषयी घेतलेली थेट भूमिका, विकासाच्या प्रक्रियेत वंचितांना स्थान मिळवून देण्यासाठी केलेला देशव्यापी जागर याविषयी भाष्य केले आहे. दादाभाई नवरोजी यांनी ब्रिटिशांनी केलेले आर्थिक शोषण, साम्राज्यवादातून निर्माण केलेली गुलामगिरी याला विरोध केला. स्वातंत्र्यलढय़ाला आर्थिक स्वातंत्र्याची प्रभावी जोड दिली, हिंदुस्थानच्या होणाऱया लुटीबाबत त्यांनी जाब विचारला याची माहिती दिली आहे. कामगार नेते बगाराम तुळपुळे यांनी कामगार हितासाठी लढा देताना वैयक्तिक जीवनात आचरणात आणलेली नैतिकता, श्रम आयोग सदस्य म्हणून केलेले काम हे पुस्तकात वाचण्यास मिळते.
रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी विकसित केलेले अद्भुत संघटनशास्त्र, त्या शास्त्राला दिलेली कृतीची जोड, व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माणाची मांडलेली व्यावहारिक भूमिका आणि हिंदुस्थानी मुळांच्या आधारे समाजाचे एकत्रीकरण याविषयी पुस्तकात माहिती आहे. गोळवळकर गुरुजी यांनी विविधतेतील एकता या हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाच्या आधारे सुरू केलेल्या विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय संघटना आणि संघ विचारांचा विस्तारलेला पाया यावर डॉ. किनरे यांनी लिहिले आहे. आणीबाणी विरोधी लढय़ाला देशव्यापी करणे, लोकशाही रक्षणासाठी आंदोलन विस्तारात नेणे आणि नायकत्व सहजपणे मिळत असताना ते जाणीवपूर्वक नाकारून अनामिक राहणाऱया बाळासाहेब देवरस यांच्याविषयी माहिती आहे.
विद्यार्थी चळवळीला राष्ट्रीयतेशी जोडून 60 ते 80 च्या दशकात त्यावेळच्या पॉप्युलर विद्यार्थी संघटनांचे अनुकरण न करता, प्रतिक्रियावादी न होता अभाविपला भक्कम सैद्धांतिक भूमिका देणाऱया प्रा. यशवंतराव केळकर यांच्याविषयी माहिती आहे. कोकणच्या समतोल विकासाचा आग्रह धरणारे तत्कालीन खासदार प्रेमजीभाई आसर यांच्या लेखातून जनसंघाच्या कामाचा अंदाज येतो. कवी, डॉ. हेडगेवार यांचे चरित्रकार, संघ प्रचारक आणि प्रचारक म्हणून थांबल्यावरही संघ जगणारे नाना पालकर पुस्तकातून भेटतात. मुकुंदराव पणशीकर यांनी केलेले धर्मजागरण आणि त्यातून मानवी कल्याणाचा अनुभव वाचण्यास मिळतो. सुरेशराव केतकर यांनी संघटनेचे सूत्र कधीही सोडले नाही. परिश्रमाने ध्येयसाधना केली. त्याचे वर्णन डॉ. किनरे यांनी केले आहे. उत्तन, भाईंदर येथील केशवसृष्टीचा व्याप वाढला आहे. प्रकल्प आज एक मापदंड झाला आहे. प्रकल्प विस्तारत आहे. या प्रकल्पाची मूळं खोलवर पसरली आहेत. मात्र, मूळ धरूच नये अशा काळात जनार्दन नलावडे ठामपणे उभे राहिले होते. विरोधाला थेट भिडत प्रकल्पाचे रोपटे रुजविणाऱयात जनार्दन नलावडे आघाडीवर होते. त्या जनार्दन नलावडे यांची भेट डॉ. किनरे घडवतात.
लेखक डॉ. पां. रा. किनरे हे कामगार नेते आहेत. कामगार नेत्याच्या ठायी असेलला कणखरपणा डॉ. किनरे यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. यापूर्वी त्यांनी कामगार, अर्थकारण अशा विषयांवर पुस्तक, पुस्तिका लिहिल्या आहेत. ‘तृप्तीची तीर्थोदके’ लिहिताना त्यांच्या संवेदनशील मनाने या थोर व्यक्तींचे वर्णन अगदी आतून केले आहे. यातील काही व्यक्तींचा सहवास डॉ. किनरे यांना मिळाला आहे. काही जणांबरोबर त्यांनी काम केले आहे. काहींची भेटही झालेली नाही, पण त्यांचा डॉ. किनरे यांच्यावर प्रभाव आहे. प्रा.डॉ.अशोक मोडक यांची प्रस्तावना वाचनीय झाली आहे. राष्ट्रकारणे तनमन अर्पण करणाऱया व्यक्तींवरील हे पुस्तक सामाजिक सक्रियता टिकविण्यासाठी मदत करील.



























































