कुटुंबाची सामान्य व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रो. डॉ. शशिकांत लोखंडे

कुटुंबकथा या सामाजिक कथाच आहेत. मराठी कथा-कादंबरी साहित्यातील आशयविश्व ह. ना. आपटे यांच्यापासून जी. ए. कुलकर्णीपर्यंत कुटुंब-लक्ष्मी आहे. अपवाद ‘कोसला’, ‘सात सकं त्रेचाळीस’, ‘बॅरिस्टर धोपेश्वर’ अशा काही कादंबऱया होत. विद्या पोळ-जगपात यांची ‘जगणं कळतं तेव्हा’ हीही कादंबरी कुटुंबविश्वाचे चित्रण करणारी आहे. माणसाला जगणं जेव्हा कळतं पुष्कळसं जगणं हातून निसटून गेलेलं असतं किंवा सार्थ जगणं उशिरा कळतं आणि असं काहीसं सांगणारी कुटुंबकथा विद्या पोळ-जगताप यांच्या कादंबरीत आहे. कुटुंबात समूहानं माणसं नसतात तर त्या त्या मानस-प्रवृत्ती असतात आणि निसर्गतः परस्परविरोधाने त्यात लहानमोठे संघर्ष असतात. वाद-प्रतिवाद, परंपरावाद-नवतावृत्ती असं सारं काही महाभारत कुटुंबविश्वात अग्रक्रमावर असतं आणि त्यातच जीवनाची इतिश्री सार्थ ठरणारी असते. मानसिक विकार, जगण्याच्या चुकीच्या कल्पना, स्वभावाचा अतिरेक वगैरे त्या अनुषंगानेच उद्भवतात. यासंबंधीच्या अनुभवांना चित्रमयता येणं गरजेचं असतं. पण पुष्कळदा अनुभव चित्रांची जागा पात्रमुखातून लेखकाची विचारसरणी (भाष्य) घेत असते. याला अपवाद विद्या पोळ-जगताप यांची कादंबरी नाही.

ही कादंबरी स्वकथानाच्या माध्यमातून सुरू होते. ‘भाऊ’ हे वडील हे या कथनभाष्याचे केंद्र आहे. किंबहुना ‘दारूचा एक प्याला’ हा कादंबरीतील नाटय़विषय आहे. त्यासोबत आधुनिक जीवनसंदर्भातील भाष्ये येतात. Generation Gap याचाच परिपाक या कादंबरीत सनातनपणे आलेला आहे.

लेखिका म्हणते त्याप्रमाणे ही कादंबरी काही संदेश देणारी नसली तरी कादंबरीतील अनुभवविश्व प्रत्यक्षात पुष्कळशा कुटुंबात असंच आहे हे सांगणारी आहे. एक कष्टकरी कुटुंबवत्सल बाप आणि त्याचा वापर करून घेणारी त्याची पिलावळ आणि बापाशी विद्रोह करण्याची पिलावळीची प्रवृत्ती हे चित्र विज्ञान युगातील घराघरात थोडय़ाफार तपशिलाच्या भिन्नतेने सारखेच आहे, असावे.

सुनंदा ही आई, भाऊ हे वडील. वडील शाळामास्तर. आई थोडं शिकलेली. दोघं नवराबायको वळणदार सुसंस्कृत. त्या सुसंस्कृतपणाचा मुलावरही प्रभाव आहे. मुक्ती ही मोठी मुलगी, भक्ती ही दोन नंबर आणि अभिषेक आणि बाळा हे दोन मुलगे… पुढे चारही अपत्ये विवाहित होतात. चांगलं शिकून सुरक्षित होतात. वडिलांचे पूर्वानुभव काही प्रमाणात त्यांना कामी येतात. या बाह्यदर्शनी सुखी वाटणाऱया कुटुंबात व्यथांचा प्रादुर्भाव होतो आहे. सामान्य कर्जामुळे वडील ‘एकच प्याला’ जवळ करतात. बायको सुनंदावर अनैतिकतेचा आरोप-संशय घेतात. नवरा-बायकोत मानसिक दुरावा निर्माण होतो. मुलांना ते पाहवत नाही. अनेकवार न पिण्याची प्रतिज्ञा करूनही भाऊ खंडित सातत्यानं मद्याच्या आहारी जातच राहतात. पुष्कळवेळा स्वप्रायश्चित म्हणून रात्री-अपरात्री घराबाहेर (कन्फेशनसाठी) पडतात. मुलं त्यांना शोधून परत घरी आणतात. अशा वातावरणात दोनवेळा भाऊंना अपघात होतात. त्यातून ते बचावतात. शेवटी एका वारीला जाताना त्यांच्या वाहनाला जबरदस्त अपघात होतो. त्या अपघातात ते अखेर गतप्राण होतात.

कादंबरीत कुठेही चढउतार, क्लायमॅक्स नाही. मोठी मुलगी मुक्ती ही हे सगळं स्वकथन माध्यमातून व्यक्त करीत आहे. मुलांच्या आयुष्यातही काहीएक म्हणावे तसे विपरीत दुर्भाग्य वगैरे घडत नाही. ‘सुनंदा’चे पुढे काय झाले कळत नाही. ‘मुक्ती’ बाप समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. मुक्ती अनेक गोष्टीसंबंधी निबंधच सांगत असते. उदा. पुरुषप्रधान संस्कृती इत्यादी इत्यादी. उदा. नवरा-बायकोच्या नात्यातील असाच अंतर्मनातून एकमेकांविषयी उद्रेक चालू झाला तर कुटुंबाची पडझड अपरिहार्य (पृ. 82) किंवा ‘नादात्म्य पावणं म्हणजे काही वेळी मुलं विशेषतः मोठी मुलं आईवडिलांच्या समस्यांशी तादात्म्य पावतात आणि त्या समस्या म्हणजे आपल्याच समस्या आहेत असं मान्य करून अचानक प्रौढपणे वागू लागतात (पृ. 88). नायिका ‘मुक्ती’च्या माध्यमातून लेखिका सतत आपले विचार मांडताना दिसते म्हणून पात्रांना ‘वाङ्मयीन विकास’ नाही.

जगणं कळतं तेव्हा उशीर झालेला असतो, पण सामान्य जगण्यातही काही थ्रिल अपेक्षित असते. एकमेकांना सहन न करणाऱया नवरा-बायकोचं, नात्यातील विसंवादाचं येथे दर्शन आहे. मुलांचे अनुभवविश्व-भावविश्व, परिवार आणि संघर्ष याचे फारसे गडद चित्रण या कादंबरीत येणे आवश्यक होते. बायकोची अगतिकता (सुनंदा), नवऱयाची व्यसनाधिनता (भाऊ) याबाबत ही कादंबरी. ‘कथेचा मूळ गाभा पती-पत्नीमधील विसंवादाचे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिणाम कसे होत जातात हा आहे आणि हे सारे ‘मुक्ती’ ही मोठी मुलगी सांगत आहे. तथापि अनेक घटनांचे विश्लेषण ‘मुक्ती’च्या माध्यमातून लेखिकाच करते त्यामुळे रसभंग होतो. ही कथा तशी काल्पनिक असू शकत नाही. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील हे सामान्य चित्र आहे. येथे वडिलांचे दारू पिणे ही समस्या म्हणून ठामपणे उभी केली आहे. हे फारच ‘कॉमन’ अहे. तथापि त्यामागे स्वानुभवाचा पोळ असेलही. वाङ्मयीन क्षेत्रात ही कादंबरी चोखंदळ वाचकाला नवे काहीही देत नाही, पण अतिसामान्य माणसाला स्वानुभवाचा प्रत्यय देण्यात ही कादंबरी अग्रेसर ठरेल. ‘नाकारता येत नाही’ म्हणून ही कादंबरी राजहंस प्रकाशनने प्रकाशित केली हे कौतुकास्पद आहे.

जगणं कळतं तेव्हा
लेखक – विद्या पोळ-जगताप
प्रकाशन – राजहंस प्रकाशन प्रा. लि.
पृष्ठs – 255, मूल्य – रु. 200/-