ट्रेन-18च्या आसनांना ‘पुश बॅक’ यंत्रणा नाही! उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच तांत्रिक बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेल्या सेमी हायस्पीड ट्रेनला दुसऱ्यादिवशी तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. तसेच या ट्रेनच्या सामान्य श्रेणीच्या आसनांना ‘पुश बॅक’ यंत्रणा नसल्याने प्रवाशांना पाठदुखीला सामोरे जावे लागू शकते. उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील तुंडला जंक्शनजवळ तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास या अत्याधुनिक गाडीला ‘ब्रेक डाऊन’चा सामना करावा लागला. भल्यापहाटे तुंडला जंक्शनजवळ तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ट्रेनच्या सर्व यंत्रणा संगणक संचालित असल्याने सिस्टम डाऊन होऊन चार डब्यांतील वीज प्रवाहदेखील खंडित झाला. त्यामुळे या गाडीतून दिल्लीला चाललेले रेल्वे प्रवासी आणि पत्रकार चांगलेच खिंडीत सापडले. त्यामुळे या प्रवाशांना ‘विक्रमशीला एक्सप्रेस’मधून पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

मोटार कोचला ‘कॅटल गार्ड’ नाही...
या गाडीच्या समोर नीलगाय आल्याने ट्रेनचे संचलन ठप्प झाल्याचे म्हटले जात आहे. ट्रेनच्या एअरो डायनामिक मोटार कोचला पुढे चाकांच्या सुरक्षेसाठी ‘कॅटल गार्ड’ नसल्याने त्यात गुरे अडकल्यास गाडीच्या चाकाखाली ती अडकून तांत्रिक आणीबाणी येऊ शकते वा थेट गाडी घसरूदेखील शकते असा इशारा तंत्रज्ञांनी दिला आहे.

आसनांकडे दुर्लक्ष..!
या गाडीची ‘सस्पेन्शन यंत्रणा’ भक्कम असल्याने 130 च्या वेगातही गाडीत प्रवाशांना धक्के अजिबात जाणवत नव्हते. परंतु आसनांना ‘पुश बॅक’ यंत्रणा नसल्याचे उघड झाले. एक्झिक्युटिव्ह क्लासच्या सिट्स फारच आरामदायी असल्याने येथील प्रवाशांना फारसा त्रास होत नसल्याचे जाणवले.