बदलापूर पालिकेचा 510 कोटी 29 लाख रुपयांचा अर्थसंकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बदलापूर

बदलापूरकरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, वाहतुकीसाठी मजबूत रस्ते, मनोरंजनासाठी नाट्यगृहे, स्टेडिअम तसेच प्रशासकीय कामकाजासाठी सुसज्ज इमारत उभारण्याचा संकल्प करत आज बदलापूर नगरपालिकेने 14 लाख 43 हजार रुपयांच्या शिलकीसह 510 कोटी 29 लाख रुपयांचा 2019-20 सालचा बजेट सादर केला. विविध विकासकामे करत असताना कोणत्याही प्रकारची करवाढ न केल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा दिला आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे 2019-20 साठीचे अंदाजपत्रक शनिवारी सादर करण्यात आले. यावर्षीच्या अंदाजपत्रकात कोणत्याही नव्या कराची वाढ करण्यात आली नाही. काढलेल्या मालमत्ता कर आणि इतर उत्पन्नांमुळे सर्वपक्षीयांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. गेल्या वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार 118 कोटी 83 लाख रुपयांची शिल्लक होती. या शिलकीचा नव्या उत्पन्नात समाविष्ट करून 510 कोटी 44 लाखांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले, तर 510 कोटी 29 लाख रुपयांचा खर्च येत्या वर्षभरात केला जाणार आहे.

विकास हाच ध्यास
अर्थसंकल्पात संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लाकण्यासाठी तब्बल 5 कोटी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तीन कोटी 25 लाख, बायपास रस्त्यांसाठी 11 कोटीं, स्टेडिअमसाठी 15 कोटी तर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बदलापुरातील नाट्यगृहासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबत क्रीडांगणे, बालोद्याने सुधारणा, स्मशानभूमी सुधार, वाहतूक नियंत्रण आणि रस्तेबांधणी व सुधारासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

नवी मुंबई पालिकेचे बजेट सादर
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी तीन हजार 454 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीत सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शहरातील विविध विकासकामांबरोबर नेरुळ येथे सायन्स पार्क, झाडांच्या फांद्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प आणि वाशी येथे तयार करण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.