परभणीत घरफोडी ; 80 हजारांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । परभणी

शहरातील जुना पेडगाव रोडवरील चिद्रवार नगरातील उमाकांत कत्रुवार हे आपल्या कुटुंबीयासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा अज्ञात चोरट्यांनी गैरफायदा घेत घरफोडी केली. या घरफोडीमध्ये 80 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शहरातील जुना पेडगाव रोड भागातील चिद्रवार नगरातील कुलपबंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 80 हजारांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या नगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच घरफोडीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्री गस्त घालावी अशी मागणी नागरिकातून जोर लागली आहे. परभणी शहरातील चिद्रवार नगरातील रहिवासी उमाकांत कत्रूवार कुटूंबासह शनिवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास नांदेड येथे गेले होत. त्यामुळे घराला कुलूप लावले होते. ही संधी साधत चोरट्यांनी चिद्रवार यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचा कडीकोंयडा व कुलूप तोडले. या दरवाज्याला स्मार्ट लॉक लावले होते. हे लॉकही लोखंडी गजाच्या सहाय्याने तोडून चोरटे घरात घुसले. घरातील तीन कपाट फोडून सोन्या, चांदीचे दागिने व रोख 7 ते 8 हजार रुपये असा सुमारे 80 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास उमाकांत चिद्रवार हे घरी परतले तेव्हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत असून अद्याप काहीही धागेदोरे हाती लागले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी ऊरुस यात्रा सुरू असल्याने नागरिकांनी घराला कुलूप लावून बाहेरगावी जावू नये, तसेच आपल्या मालमत्तेचे रक्षण करावे, असे आवाहन केले होते.