
सामना प्रतिनिधी । नांदेड
मंगळवारी सायंकाळी दिसणारा पोर्णिमेचा चंद्र हा सुपरमून असणार असून, आकाशातील चंद्र आज सरासरीपेक्षा 14 टक्के मोठा आहे. या वर्षात हे अंतर कमी असल्याने हा सुपर मून 30 टक्के जास्त प्रकाशमान असणार असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सामनाशी बोलताना दिली.
पुर्व आकाशात सायंकाळी 6.22 वाजता चंद्रोदय होणार आहे. यावेळेस त्याच्या दक्षिणेला सुमारे दोन अंशांवर सिंह राशीतील प्रमुख तारा मघा पहायला मिळणार आहे. 2019 मधील पहिल्याच पौर्णिमेचा चंद्र सुपरमुन झाला होता. आता फेब्रुवारी व मार्च या महिन्यातील पौर्णिमेला देखील सुपरमून असणार आहेत. या तिन्ही महिन्यातील सर्वात कमी म्हणजे पृथ्वी -चंद्र अंतर हे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री 09:23 वाजता 3,56,846 कि.मी. असणार आहे. म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा सुपरमून असणार आहे.
21 मार्च रोजी हेच अंतर थोडे वाढून 3,60,772 कि.मी. असणार आहे. तर दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी वर्षातील सर्वात दूर अंतरावर असताना चंद्र 4,06,248 कि.मी. असेल. सायंकाळी पुर्व आकाशात चंद्र सरासरीपेक्षा चौदा टक्के मोठा दिसणार असून या वर्षात अंतर कमी असल्याने सुमारे तीस टक्के जास्त प्रकाशित दिसणार आहे.
ही खगोलीय घटना थेट डोळ्यांनी पहायला मिळणार आहे. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची गरज भासणार नाही. ही खगोलीय घटना अनुभवावी, असे आवाहन एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.



























































