करवले डंपिंग ग्राऊंड प्रकल्पग्रस्तांना मिळणार 500 चौ. फुटांची घरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईच्या कचऱयाची समस्या मार्गी लावण्यासाठी अंबरनाथ येथील करवले गावात नवीन डंपिंग ग्राऊंड उभारण्यात येणार असून या जागेवर राहणाऱया नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी रहिवाशांना सुमारे 500 चौ. फुटांची घरे देण्यात येणार असून स्थलांतरासाठी येथील रहिवाशांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

जागेअभावी होणारी मुंबईची कचराकोंडी सोडविण्यासाठी अंबरनाथ येथील करवले गावात सुमारे 30 एकर जागेवर डंपिंग ग्राऊंड उभारण्यात येणार आहे. ही गायरान जागा असून या जागेवर काही रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. राज्य सरकार लवकरच ही जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात देणार आहे. त्यासाठी सरकारकडून येथील रहिवाशांच्या पुनर्वसनास सुरुवात करण्यात आली आहे, परंतु स्थानिक रहिवाशांनी याला आक्षेप घेत घरे तोडण्याची मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारच्या वतीने ऍड. निशा मेहरा यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, सदर रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांना 500 चौ. फुटांची घरे देण्यात येणार आहेत. स्थलांतरासाठी आठजणांना 50 हजार रुपयेही देण्यात आले आहेत. स्थानिक कुटुंबीयांनी ही रक्कम स्वीकारल्याचे सांगत त्यांनी याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला. त्याचप्रमाणे यासंदर्भात दुसऱया खंडपीठासमोर सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले. हायकोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून घरांवरील कारवाई थांबविण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली व संबंधित खंडपीठासमोर दाद मागण्याच्या सूचना केल्या.