परळी येथे होणार राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस-कॉग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीची राज्यस्तरीय दुसरी संयुक्त प्रचार सभा शनिवारी परळी वैजनाथ (जि.बीड) येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. या भव्य आणि ऐतिहासिक संयुक्त प्रचार सभेतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परळी वैजनाथ शहरातील वैजनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात होणार्‍या या सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेसतर्फे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे व राज्य सभेतील विरोधी पक्षनेते खासदार गुलाम नबी आझाद यांनाही निमंत्रित करण्यात आले असून या दोघांपैकी एक तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, पी.आर.पी. राष्ट्रीय अध्यक्ष जोंगेंद्र कवाडे यांच्यासह प्रदेश पातळीवरील सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. मराठवाड्यातील पक्षाचे आजी माजी, आमदार, खासदार, पदाधिकारी, काँग्रसचे स्थानिक पातळीवरील नेते मंडळी यांनाही निमंत्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या सभेस 1 लाख लोकांची उपस्थिती राहिल व या सभेतून केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यातही परिवर्तनाचा संदेश देणारी ही ऐतिहासिक सभा असेल असा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्यातील सरकारने 5 वर्ष जनतेला फसवले आहे. या फसवणुकीचा रोष जनता या सभेला उपस्थित राहून व्यक्त करेल, आगामी निवडणुकीत मतपेटीतून ही व्यक्त होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी उपस्थित होते.