
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘डीएसके’ तथा दीपक कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमांगी आणि मुलगा शिरीष यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तब्बल साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश ए.यू. कदम यांच्यासमोर दाखल करण्यात आले आहे. सुमारे 350 गुंतवणूकदारांची 19 कोटी 77 लाख 80 हजार 517 रुपयांची फसवणूक झाल्याचे या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले असून या सर्व गुंतवणूकदारांचा यात साक्षीदार म्हणूनही समावेश करण्यात आला आहे.
पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसके’ कंपनीत आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिह्यांतील गुंतवणूकदारांची दोन हजार 43 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप डीएसके यांच्या विरोधात ठेवण्यात आला होता. यात कोल्हापूर जिह्यातीलही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने या सर्वांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दीपक कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमांगी व मुलगा शिरीष यांच्याविरोधात एकत्र येऊन फिर्याद दिली होती. जानेवारी 2018मध्ये हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या वेळी तपासात 350 तक्रारदारांची 19 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे चौकशीत समोर आले होते.
दरम्यान, तपास अधिकारी व आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर.बी. शेंडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कोल्हापूरसह सांगली जिह्यातील ‘डीएसके’च्या मालमत्ता ‘सील’ करण्यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकाऱयांनी केलेल्या पत्रव्यवहाराचा समावेश केला असून या दोन्ही ठिकाणांच्या डीएसके यांच्या सात मालमत्ता ‘सील’ केल्याचेही तपास अधिकारी शेंडे यांनी सांगितले. या प्रकरणी गुंतवणूकदारांची रक्कम परत देण्यासाठी मावळ (पुणे) येथील उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे



























































