Pulwama Attack- शहिदाच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकासोबत आमदाराने केली धक्का-बुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सध्या संपूर्ण देशात जनक्षोभ उसळला आहे. सगळा देश शहिदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील झाला आहे. पण, एका आमदाराने मात्र शहिदाच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकासोबत धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून आमदारावर टीका होत आहे. देबाशीष समनतरे असं या आमदाराचं नाव असून ते बीजू जनता दलाचा ओडिशामधील बाराबती-कटक इथले आमदार आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे जवान मनोज कुमार बेहरा यांच्या अंत्यसंस्कारावेळी हा प्रकार घडला. शहीद बेहरा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी ओडिशातील रतनपूर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समनतरे यांनी बेहरा यांच्या अंत्यदर्शनासाठी तिथे आलेल्या नातेवाईकासोबत धक्का-बुक्की केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये समनतरे हे शहीद बेहरा यांच्या पार्थिवाशेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या नातेवाईकाला धक्का देताना दिसत आहेत.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समनतरे यांच्यावर कडाडून टीका होत आहे. अशा दुःखाच्या प्रसंगी सगळा देश शहिदांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असताना आमदाराचं अशा प्रकारचं कृत्य अशोभनीय असल्याची भावना व्यक्त होत आहे. समनतरे यांनी या प्रकारावर माफीही मागितली आहे. मी जाणूनबुजून त्यांना धक्का दिला नाही. तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे शिस्तीचं पालन करण्याचा मी प्रयत्न करत होतो, असं स्पष्टीकरणही समनतरे यांनी दिलं आहे.