
सामना प्रतिनिधी । येवला
येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या लागत असलेल्या शासकीय विहिरीवर गेल्या अनेक महिन्यांपासून पाईपासह इतर साहित्य खराब झाल्याने टँकर भरण्यास उशीर होत होता. शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे सदरचे साहित्य बदलण्याला होणाऱ्या उशिरामुळे टँकर चालकही त्रस्त होते. टँकरचालकांनी बुधवारी सकाळी टँकर उभे केल्यानंतर शिवसेना आणि नारायनगिरी महाराज फाऊंडेशनने विहिरीवर जाऊन त्वरित पाईपासह इतर साहित्य नव्याने घेऊन देत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा दिला आहे.
मंगळवारी रात्री पाणी टँकर उशिरा गावात आल्याने तालुक्यातील एक गावात ग्रामस्थांनी टँकर चालकाला मारहाण केली होती. यामुळे संतप्त होत शासकीय टँकरवरील चालकांनी बुधवारी सकाळी साठवण तलावाजवळील विहिरीवर टँकर उभे करून निषेधाचे हत्यार उपसले होते. ही गोष्ट समजताच पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, उपसभापती रूपचंद भागवत यांनी शासकीय विहिरीवर जाऊन टँकर चालकांची समजूत घातली. टँकर चालकांनी मात्र यावेळेस शासकीय विहिरीवर पाईप, फुटबॉल व इतर साहित्य खराब असल्याने टँकरमध्ये पाणी भरण्यास उशीर लागत असल्याचे तक्रार केली. शिवसेना आणि नारायनगिरी महाराज फौंडेशनच्या वतीने लगेचच शासकीय विहिरीवरील पाणी भरून देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उपसभापती रुपचंद भागवत यांनी साहित्य उपलब्ध करून दिले. शासकीय उदासीनतेमुळे जे खराब झालेले साहित्य बदलण्यास उशीर लागत होता ते शिवसेनेने उपलब्ध करून दिल्याने टँकर चालकही सुखावल्याचे दिसून आले.
फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यातील २७ खाजगी व दोन शासकीय टॅंकरने रोज ४७ गावे व २९ वाड्यावर ७५ खेपाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सरासरी १४ हजार लिटर पाणी एका खेपेला असे सुमारे १० ते १२ लाख लिटर पाणी रोज येवलेकरांची तहान भागवत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावालगतच्या नांदूर व दूध विहिरीवरून भरले जात आहे. साठवण तलावतील पाण्याचीही तळ गाठल्याने या विहिरींचा पाणी उपसा होत असून टॅंकर भरणे जिकिरीचे झाले आहे. त्यासाठीही भविष्यात पर्यायी व्यवस्था करणे खूप गरजेचे झालेलेल आहे.
यावेळी शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, सर्जेराव सावंत ,नाना भड, समन्वयक धीरज परदेशी, शहर संघटक राहुल लोणारी, उपतालुका कार्यालय नवनाथ खोडके, माऊली काळे, सोनुशेट सोमासे, संतोश गायकवाड योगेश बारसे, दिपक जेजूरकर, निरंजन ठोंबरे, ज्ञानेश्वर भागवत, मनोज भागवत,भगवान आंधळे, समाधान दराडे आदी उपस्थित होते.





























































