
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
सेवानिवृत्ती नंतर निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधीची सर्व कागदपत्रे पूर्ण करून ती मंजूर करून घेण्यासाठी सात हजाराची लाच घेताना गुहागर येथील एका महाविद्यालयातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
वरिष्ठ लिपिक उदय वसंत रावणंग वय ४७ आणि कनिष्ठ लिपिक राजेश महादेव खामकर वय ४८ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तक्रारदाराकडे निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधीची सर्व कागदपत्रे पूर्ण करून ती जिल्हापरिषद शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून दुपारी पावणे दोन वाजता सात हजार रुपयांची लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रानमाळे, निरीक्षक प्रवीण कदम, संदीप ओगले, संतोष कोळेकर, विशाल नलावडे, श्रेया विचारे, चंद्रकांत कुळ्ये, दिपक आंबेकर यांनी ही कारवाई केली.





























































