गदिमांचे सुपुत्र आणि साहित्यिक श्रीधर माडगूळकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे पुत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

बुधवारी खासगी रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी 1 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीधर माडगूळकर यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1947 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी 1970 साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करून अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले. त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रीधर माडगूळकर यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींकरील ‘मंतरलेल्या आठवणी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून लेखन केले होते. गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

श्रीधर माडगूळवर यांनी गदिमांची गाणी व आठवणी, थोरली पाती-धाकटी पाती यासारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले. दूरदर्शन तसेच आकाशवाणीकरील अनेक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. 1997 साली इंटरनेटवर मराठी भाषेतील ‘जाळं’ या पहिल्या साप्ताहिकाची सुरुवात करून याचे यशस्वी संपादन केले. ‘गदिमा डॉट कॉम’ या मराठीतील सर्वांत मोठ्या साहित्यिक वेबसाइटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी बजावत होते. ‘मराठीसृष्टी डॉट कॉम’ या साहित्यिक वेबसाइटच्या सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते. त्यांनी सांगली जिल्ह्यातील माडगुळे या खेड्यात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून कै. ग. दि. माडगूळवर हायस्कूल सुरू केले.  

युवक चळवळींमध्ये सहभाग

युवक चळवळींत त्यांचा पहिल्यापासूनच सहभाग असायचा. महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थ्यांच्या विविध चळवळींत सहभाग घेतला. 1978 साली त्यांची पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी व शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. या काळात झोपडपट्टी सुधारणा, रक्तदान, वनसंवर्धन आदी कार्यक्रम घेऊन सुशिक्षित बेकारांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच कामगारांसाठीही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. संजय गांधी निराधार योजना, सेन्सॉर मंडळ, आयटीआय निवड समिती, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, फिल्म ऍडव्हायझरी कमिटी, ऑल इंडिया रेडिओ, पुणे दुग्धविकास प्रकल्प सल्लागार समिती, गदिमा स्मारक या सरकारी संस्थांवर त्यांचा सहभाग होता.