लातूर महानगरपालिका सेवक आणि खासगी मदतनीस लाचेच्या जाळ्यात अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe

सामना प्रतिनिधी, लातूर

शहर महानगर पालिकेतील सेवक आणि खासगी मदतनीस बांधकाम कामगारांकडून प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर शहर महानगर पालिकेच्या झोन सीमध्ये बांधकाम कामगारांना प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्यासाठी महानगर पालिकेत सेवक पदावर कार्यरत असणारा राधाकिशन बयास यांनी आणि मदतनिसाचे काम करणारा गौस शेख यांनी 200 रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सापळा लावण्यात आला होता.

गौस जाकीर शेख याने 100 रुपयांची लाच मागितली होती. तर सेवक राधाकिशन छगनसिंग बयास याने सदर कामासाठी आम्ही 200 रुपये घेतो असे सांगून शेख याच्याकडे 50 रुपये द्यावेत असे सांगितले होते. लावलेल्या सापळ्यात हे दोघेही अडकले आणि त्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी प्रभारी पोलीस उपअधीक्षक कुमार दराडे, पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.