
सामना प्रतिनिधी। मुंबई
पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यापाठोपाठ रायगड जिह्यात एका एसटी गाडीत जिवंत बॉम्ब सापडल्याची घटना ताजी असतानाच तब्बल 80 लाख रेल्वे प्रवाशांच्या जिवाला घोर लावणारा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. मुंबईची ‘लाइफलाइन’ मानली जाणारी लोकल आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे कळविण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मुंबईसह राज्यभरात ‘हाय ऍलर्ट’ देण्यात आला असून रेल्वे स्टेशनांवर सुरक्षा वाढविण्यात आली. इतकेच नव्हे तर लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसचीही कसून तपासणी सुरू झाली आहे
बुटपॉलिशवाले, पेपर स्टॉलधारक आणि कँटिन कर्मचाऱयांचाही वॉच
रेल्वे स्थानके, बस आगार, एसटी स्थानके याठिकाणी बसणारे बुट पॉलिशवाले, पेपर स्टॉलधारक यांनाही प्रत्येक संशयास्पद हालचालींवर अतिशय बारीक वॉच ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
हॉटेल आणि लॉजेसमध्ये सरप्राइज चेकिंग
हॉटेल आणि लॉजेसमध्ये येणाऱया जाणाऱया प्रत्येकावर तसेच त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. दहशतवाद्यांकडून या ठिकाणांचा वापर घातपाती कारवायांसाठी होऊ नये यासाठी हॉटेल आणि लॉजेसमध्ये सरप्राइज चेकिंग करण्यात येणार आहे.
लोकलचे जाळे
मध्य रेल्वेच्या रोजच्या लोकल फेऱया 1772
मध्य रेल्वेवरील रोजचे प्रवासी 43 लाख
पश्चिम रेल्वेच्या रोजच्या लोकल फेऱया 1365
पश्चिम रेल्वेचे रोजचे प्रवासी 36 लाख
रोज प्रवास करणारे प्रवासी सुमारे 80 लाख





























































