रायगड जिल्ह्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्ह्यातील 79 सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्य पदासाठी 24 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 79 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी 300 मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क साडेसात ते साडेपाच या दरम्यान बजावणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी 1 हजार आठशे शासकीय व पोलीस कर्मचारी मतदान केंद्रावर आपली जबाबदारी पार पडणार आहेत.

24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक मतदानाच्या अनुषंगाने कर्मचारी वर्गाला निवडणुकीच्या सामानाचे वाटप करण्यात आले असून मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना झाले आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनांची सुविधा करण्यात आलेली होती. तर निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडूनही जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 79 सरपंचपदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत 689 सदस्य पदासाठी 1 हजार 631 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात 79 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी मतदान होणार असून 25 फेब्रुवारी 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. सदर वेळी कोणताही कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने ज्या पोलीस स्टेशन हद्दीत निवडणूक पार पडणार आहे त्या ठिकाणी विभागातून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सोबत पोलिस मुख्यालय अलिबाग येथून पोलीस स्टेशन निहाय 157 पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

प्रचार करण्याचा कालावधी संपला असल्याने उमेदवारांचा आता छुपा प्रचार सुरू झाला असून प्रत्येक राजकीय पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदार कोणाला आपले मत दिले हे 25 फेब्रुवारी मतमोजणी दिवशी कळणार आहे.