
सामना प्रतिनिधी । टोंक
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने अवघ्या 100 तासांतच घेतला आहे, असे सांगतानाच आपली लढाई कश्मीरसाठी असून कश्मिरींविरोधात मुळीच नाही. त्यामुळे कश्मिरींवर हल्ल्याचे प्रकार हे ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणार्या गँगला बळकटी देणारे ठरतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिला. ते राजस्थानातील टोंक येथील जाहीर सभेत बोलत होते.
लोकसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी मोदी यांनी सभांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या सभेआधी त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 40 जवानांना आदरांजली वाहिली. पुलवामा येथील हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर 100 तासांतच आपल्या जवानांनी ‘जैश-ए-मोहम्मद’चा कमांडर कामरान याचा खात्मा केला. त्यांनी पुलवामाचा बदला घेण्याच्या केलेल्या या कारवाईचा आपणास सार्थ अभिमान वाटतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. आम्ही आता शांत बसणार नाही. जशास तसे उत्तर देऊन हिसाब चुकता करू, असेही त्यांनी पाकिस्तानला ठणकावले.
कश्मीरच्या खोर्यात उसळलेल्या दहशतवादात कश्मिरी तरुणांवर हल्ल्याच्या घडलेल्या काही घटना दुर्दैवी असून अशा घटना घडता कामा नयेत, असे मोदी म्हणाले. कश्मीरची जनता ही दहशतवाद्यांचा निशाणा बनली असून त्यात बळी जाणारे सामान्य नागरिकसुद्धा देशासाठी बलिदान दिलेले ‘शहीद’च आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. दहशतवादाची ‘फॅक्टरी’ जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत जगात शांतता नांदणे अशक्य आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, दहशतवादाची फॅक्टरी बंद पाडण्याचे काम आपण चोखपणे पार पाडू.
“इम्रान खान पंतप्रधान झाले तेव्हा अभिनंदन करताना मी त्यांना म्हणालो होतो की, तुम्ही क्रीडा क्षेत्रातील आहात. पण आता गरिबी आणि निरक्षरता हटविण्यासाठी आपण काम करूया! त्यावर इम्रान खान यांनी ‘मी पठाणाचा मुलगा आहे. नेहमी खरे बोलतो, सत्य तेच करतो’ असे मला सांगितले होते. आता पाहूया, पाकिस्तानचे पंतप्रधान कसोटीला कितपत उतरतात!” – नरेंद्र मोदी, पंतप्रधान.


























































