आंगणेवाडी ‘भक्तीसागरात’ चिंब, लाखो भाविकांनी घेतले भराडी देवीचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण 

‘जय जय भराडी देवी’ च्या…… जयघोषात सोमवारी आंगणेवाडी नगरी भक्ती सागरात न्हाऊन निघाली. यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडीत विक्रमी संख्येने लाखो भाविकांचा जनसागर उसळला. पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांनी दर्शनास सुरूवात केली.

यात्रोत्सवात नेते मंडळी व सेलिब्रेटींनी हजेरी लावली. आंगणेवाडी मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनसाठी स्वतंत्र नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलीस बंदोबसत्तासाठी तैनात होते. सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून यात्रोत्सवावर लक्ष ठेवले जात होते.  आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या आरासने मंदिर परिसर झळाळून गेला. शेकडो दुकानांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाली. मंगळवारी मोडयात्रेने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वित्त व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, आमदार वैभव नाईक, व मुंबई, ठाणे तसेच परिसरातील नगरसेवक पदाधिकारी यासह  सर्वपक्षीय पदाधिकारी अन्य व्हीआयपीनी दर्शन घेतले.

राज्यभरातून येणारे भाविकांसाठी नऊ रांगा मधून दर्शनाची सुविधा आंगणेवाडी मंडळ मुंबई व स्थानिक मंडळाकडून देण्यात आली होती. यासह व्ही आय पी सह अपंग, महिला व अन्य मंडळींसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. मुंबई सिद्धिविनायक मंदिर धर्तीवर देवी भराडीचे मुख दर्शनासाठी व ओटी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र रांग असल्याने भाविक दर्शनाने सुखावले.

आंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई दुकाने, हॉटेल, कपडे, अवजारे अन्य प्रकारचे सर्व गृहपयोगी वस्तू खेळणी यांनी सजलेल्या दुकानात मोठी गर्दी होती. या जत्रेत कोट्यावधीची उलाढाल झाली.