
सामना प्रतिनिधी।कसारा
सामुदायिक विवाह सोहळ्यातील टार्गेट पूर्ण करण्यासाठी थेट अल्पवयीन मुलाला बोहल्यावर चढवल्याची घटना शहापुरात घडली होती. याविरोधात पालकांनी आवाज उठवत पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र आठ दिवसांनंतरही आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले नसून पोलीस चालढकल करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहापूरच्या जोंधळे कॉलेजच्या पटांगणात 17 फेब्रुवारी रोजी खासदार कपिल पाटील यांच्या फाऊंडेशन, हिंदू सेवा संघ व रागोजी भांगरा प्रतिष्ठानच्या वतीने 1101 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. मात्र आयोजकांनी विवाह सोहळ्यातील जोडप्यांचे ठरवलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी विवाहित असलेल्या जोडप्यांचे पुन्हा लग्नाचा बार उडवून दिला होता. इतकेच नाही तर यशवंत लहू बगळे या अल्पवयीन मुलालाही बोहल्यावर चढवले होते. याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, परंतु शहापूर पोलीस ठाण्यात अर्ज देऊन आठ दिवस उलटले तरीदेखील कुठल्याही प्रकारची कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश शेटये यांनी केली नाही. केवळ राजकीय दबावामुळे शहापूर पोलीस कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप लहू बगळे यांनी केला आहे.























































