धनगर समाजाला आदिवासी म्हणून वेगळे आरक्षण द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dhangar-hingoli

सामना प्रतिनिधी। मुंबई

धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्से (टीस)स या संस्थेने अभ्यास करून तयार केलेला अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. आदिवासी समाजाच्या मूळ आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केला होता. याला सभागृह नेत्यांनी उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी हौद्यामध्ये उतरून गोंधळ घातल्यामुळे अखेरीस सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे दिवसभराचे कामकाज गदारोळात उरकून घेतले.

भाजपच्या मनात असते तर 2016 मध्येच लोकसभेत 325 क्रमांकाचे विधेयक आले त्यावेळीच धनगर आरक्षण मंजूर करून घेतले असते, परंतु सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. केवळ निवडणुकीसाठी गाजर दाखवण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. रामराव वडकुते. रामहरी रूपनवर, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनीही आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.

धनगर आणि धनगड हा एकच समाज

ओडिशा आणि झारखंडमध्येही धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात आला असून त्यांना तिथे वेगळे आरक्षण आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र त्यांचा आदिवासींच्या यादीत धनगड असा चुकीचा उल्लेख केला आहे. धनगर आणि धनगड हा एकच समाज असून याचे पुरावेही आहेत. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणे हे सरकारच्याच हाती आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले.

ओबीसी आरक्षण संकटात

ओबीसींचे आरक्षण संकटात आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ते जर ओबीसी ठरले तर काय करायचे, असा सवाल शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सरकारला केला. हा विषय काढताच मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर बोलू नका असे मत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.