महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका एकाच टप्प्यात शक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक घेणे शक्य असून तशी तयारी आयोगाने केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट यंत्रांचा शंभर टक्के वापर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई भेटीवर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी मागील दोन दिवसांत राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक घेणे शक्य असून तशी तयारी केल्याची माहितीही दिली.

व्हीव्हीपॅट यंत्रणा

लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर प्रत्येक मतदाराला त्याच्या मताची खात्री पटवून देणारी व्हीव्हीपॅट यंत्रणा वापरली जाणार आहे. या यंत्रणेची आतापर्यंत 37 लाख मतदारांनी चाचणी घेतल्याचे लवासा म्हणाले. गेल्या दोन दिवसांच्या आढावा बैठकीत राजकीय पक्षांनी प्रचाराच्या संदर्भात काही सूचना केल्या. परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे लवासा म्हणाले.

ऑनलाइन मतदान नाही

निवडणुकीत ऑनलाइन मतदानाची कोणतीही सुविधा नाही. यासंदर्भात समाजमाध्यमात खोटी माहिती प्रसारित करणाऱयांवर कारवाई केली जाईल. राजकीय पक्षांनी मतदार यादीतील बोगस नावांविषयी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाला तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी, पोलीस, उत्पादन शुल्क, महसूल आणि आयकर विभागाच्या अधिकाऱयांशी चर्चा केली. यावेळी निवडणूक आयुक्त सुशील चंद्र, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार उपस्थित होते.

म्हणून दोन टप्प्यांत

महाराष्ट्रात एकाचवेळेस निवडणूक घेणे शक्य आहे. मात्र मतदारांची सुविधा व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था यामुळे विविध टप्प्यांत मतदान घेतले जाते, असे लवासा म्हणाले.

तीनवेळा जाहिरात बंधनकारक

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्यांची माहिती तीन वेळा स्थानिक वर्तमानपत्रात देणे बंधनकारक आहे. तसे न केल्याची तक्रार दाखल झाल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई केली जाईल.

सोशल मीडियावर लक्ष

समाजमाध्यमावरील निवडणूक प्रचारावर आयोगाचे लक्ष राहील. मतदानाच्या दिवशी उमेदवारांना वर्तमानपत्रात जाहिरात देता येणार नाही, असेही लवासा यांनी स्पष्ट केले.