बिबट्या दिसल्याने वडवळ नागनाथसह परिसरात दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ

चाकूर तालुक्यातील वडवळ गावापासून जवळच असलेल्या शेत शिवारात मंगळवारी सायंकाळी वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याने वडवळ परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वडवळ नागनाथसह परिसरातील घारोळा, जानवळ, महाळंगी, रायवाडी, हिंपळनेर या परिसरात एक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे. परिसरातील अनेकांनी बिबट्याला पाहिल्याचे वनविभागाला कळविले आहे. यावेळी वनविभागाने ठिकठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावला. मात्र, बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापही यश आले नाही. या बिबट्याचा शोध वनविभागाचे पथक घेत असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

तालुक्यातील वडवळ नागनाथ गावापासून जवळच पुर्व दिशेला असलेल्या नयुम पटेल यांच्या शेतात मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास एक बिबट्या दिसल्याचे गोपाळ मारोती भोजने, बाबु रघुनाथ मस्के, गणेश महादेव शिंदे, शुभम संभाजी मासुंदार यांनी सांगितले. ही बातमी गावभर पसरताच गावात दहशत पसरली. ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर दोन तासांनी वनविभागाचे वनमजूर, वनकर्मचारी आले. गावाच्या पश्चिमकडीला शेतात 9.30 वाजता बिबट्या असल्याची माहिती शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना दिली. काही वेळाने बिबट्या संजीवनी तलावाच्या दिशेने गेला. वनविभागाने शोध घेतला असता बिबट्या दिसला नाही. बिबट्या गावाच्या परिसरातच फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.

वनविभागाचे कर्मचारी काल सायंकाळपासून वडवळ येथे आले असून वनरक्षक पी.के.घुले यांच्यासह सोळा वनमजूर, वनकर्मचारी पथक वडवळमध्ये आहे. ग्रामस्थांनी घाबरू नये संजीवनी तलावाभोवती, परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग सज्ज असल्याचे सांगून ग्रामस्थांनी शांतता बाळगून सतर्क राहण्याचे अवाहन वनविभागाने केले आहे.