
सामना प्रतिनिधी । नगर
घरफोड्या करणार्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी बसस्थानकातून बुधवारी शिताफीने अटक केली. या कारवाईत गणेश गोवर्धन कल्हापुरे (रा. खडांबे, ता. राहुरी), विकास कैलास कुर्हे (रा. जुना सोनई रोड), शाहरुख किर पठाण (रा. स्टेशन रोड, राहुरी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 34 हजार रुपयाच्या 17 रिकाम्या गॅस टाक्या, एच.पी. कंपनीचे 4 हजार रुपयाचे एलईडी टीव्ही, एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भिकाजी भाऊ वाढवणे (रा. गांजी भोयरे, ता. पारनेर) यांच्या घरात रविवारी चोरी झाली होती. त्यात एलईडी टीवी, मोबाईल, गॅसची टाकी असा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हा गुन्हा गणेश कल्हापुरे (राहुरी) व त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. गणेश हा वांबोरी बसस्थानकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडारे, सोन्याबापू नाणेकर, हे.कॉ. योगेश गोसावी, पो.ना. दिगंबर कारखिले, रविंद्र कर्डिले, मनोज गोसावी, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, योगेश सातपुते, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश वाभळे, चालक सचिन कोळेकर यांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

























































