कमला मिल आगप्रकरणी आणखी तीन अधिकारी दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कमला मिल कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेला बार, हुक्का पार्लर आणि धोकादायक ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांकडे संबंधित पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच आगीची दुर्घटना घडल्याचा ठपका चौकशी समितीने आणखी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठेवला आहे. या तीनही अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली असून 15 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 29 डिसेंबर 2017 च्या मध्यरात्री घडलेल्या कमला मिल आग दुर्घटनेत 14 जणांना नाहक जीव गमवावा लागला होता.

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्त्राs आणि वन अबाव्ह या दोन पबला लागलेल्या आगीत 14 जणांना जीव गमवावा लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमून अहवाल मागवला होता. या पार्श्वभूमीवर याआधी सादर झालेल्या चौकशीत नऊ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत अनेक परवानग्या खातरजमा न करताच दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील चौकशीत आता आणखी तीन अधिकारी दोषी आढळले आहेत. याबाबतचा अहवाल चौकशी समितीने पालिका आयुक्तांना सादर केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दोषी आढळलेले अधिकारी

  • 1) प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त, के-पूर्व, तत्कालीन सहाय्यक आयुक्त ‘जी/दक्षिण’ विभाग
  • 2) भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त ‘एन’ विभाग, तत्कालीन सहाय्यक आयुक्त ‘जी/दक्षिण’ विभाग
  • 3) डॉ. सतीश बडगीरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ‘जी/दक्षिण’ विभाग (निलंबित)

या कारणांमुळेच ठेवला ठपका

  • कमला मिल आग दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर दोषारोप करताना संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करून पालिकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • विशेष म्हणजे बेकायदेशीरपणे सुरू असलेला बार, हुक्का पार्लर आणि अनधिकृत बांधकामाची माहिती असूनदेखील ठोस कारवाई न करता कारवाई केल्याचा दिखावा करण्यात आला.
  • अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने घातलेल्या अटी पूर्ण केल्या नसल्याचे माहीत असतानादेखील कारवाई करण्यात आली नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
  •  ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा कामांबाबत नागरिकांकडून कारवाई केल्याचा अहवाल सादर करून पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी देखरेख ठेवणे अनिवार्य असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
  • सदर इमारतीस कॉप्लेशन सर्टिफिकेट दिले नसताना याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. बेकायदा कामांची माहिती असूनदेखील वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या नाहीत.
  • दोषी ठरवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे कृत्य हे गैरवर्तणुकीचे, निष्काळजीपणाचे आणि पालिकेची प्रतिमा मलीन करणारे आहे.

कठोर कारवाई होणार

कमला मिल आग दुर्घटनेला जबाबदार ठरलेल्या पालिकेच्या विभाग कार्यालयातील पाच अधिकाऱ्यांना याआधीच निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आणखी 10 अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू होती. इमारत प्रस्ताव खाते, ‘जी/दक्षिण’ विभाग कार्यालय आणि मुंबई अग्निशमन दल यातील 10 अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. दरम्यान,  कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तरानंतर संबंधित दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये लवकरच आधी दोषी ठरलेल्या नऊ अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.