FinalStrike हिंदुस्थानचा ‘पायलट’ प्रोजेक्ट यशस्वी, पंतप्रधान मोदींचे सूचक उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा ‘पायलट’ प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. आता केवळ प्रॅक्टिस होती. खरे काम नंतर करू असे सूचक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘शांतीस्वरूप भटनागर’ पुरस्काराचे वितरण सुरू झाले. त्यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची गुरूवारी सुटका होणार असल्याची खबर आली. याचा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन पंतप्रधान मोदी उपस्थित वैज्ञानिक आणि संशोधकांना म्हणाले, एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्टवर काम करण्याची सवय असते. असाच एक ‘पायलट’ प्रोजेक्ट आम्हीही यशस्वी केला आहे. या कार्यक्रमापूर्वी सकाळी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देशाला एकजूट राहण्याचे आवाहन केले. आपले शूरवीर जवान सीमेवर आणि सीमेपलीकडेही पराक्रम गाजवत आहेत. या लढवय्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आपल्या लष्कराच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. लष्कराचे मनोबल तसूभरही कमी होणार नाही. त्यांच्याकडे बोट दाखविण्याची शत्रूची हिंमत होणार नाही याची आपण सर्वांनीच दक्षता बाळगावी असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. हिंदुस्थानची प्रगती थांबवण्यासाठी शत्रूकडून सुरू असलेले प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. त्याचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि डोवाल यांची चर्चा

हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी बुधवारी रात्री फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर अमेरिकेने हिंदुस्थानच्या ‘एअर स्ट्राईक’ला पाठिंबा देताना दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केल्याचे वृत्त आहे. पॉम्पिओ यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांच्याशीही फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानने आपल्या देशातील दहशतवाद संपवावा असे स्पष्ट शब्दांत सुनावले.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचा अजहरविरोधात ‘युनो’त प्रस्ताव

पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला  दहशतवाद्यांच्या जागतिक ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे या हिंदुस्थानच्या भूमिकेला अनेक देशांचा पाठिंबा मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) सुरक्षा परिषदेत यासंबंधी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने प्रस्ताव मांडला आहे. त्यात अजहरने पुलवामा येथील हल्ला केला असे प्रस्तावात म्हटले आहे. मसूद अजहरची संपत्ती जप्त करावी. त्यांच्यावर शस्त्र्ाबंदीसह आंतरराष्ट्रीय प्रवासबंदी टाकावी अशीही मागणी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेकडे केली आहे. दरम्यान, 10 वर्षांमध्ये चौथ्यांदा असा प्रस्ताव दाखल झाला आहे, मात्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य असलेल्या चीनने दरवेळी अजहरचा पुळका घेऊन प्रस्तावाला विरोध केला आहे.

हिंदुस्थान-पाकमधील तणाव निवळेल – ट्रम्प

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव लवकरच निवळेल आणि सैनिकी कारवाया बंद होतील असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. व्हिएतनाम येथे ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्यात परिषद झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प बोलत होते. हिंदुस्थान-पाकमध्ये युद्ध झाले तर त्याचे परिणाम वाईट होतील. जगातील कोणत्याच देशाला या दोन्ही देशांमध्ये युद्ध व्हावे असे वाटत नाही. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या संपर्कात अमेरिका आहे. युद्ध होऊ नये यासाठी अमेरिकेची भूमिका मध्यस्थाची आहे. हे प्रयत्न फलदायी ठरताना दिसत आहे. लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल असे ट्रम्प यांनी सांगितले.