
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशात होणाऱ्या आगामी निवडणुका नियोजित वेळेनुसार होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व म्हणजे 80 जागांवर व्हीव्हीपीएटीचा वापर करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. अशातच हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर दोन्ही देश आमने-सामने उभे ठाकले. त्यामुळे लोकसभा निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावत निवडणुका वेळेनुसारच होतील असे सांगितले.
VVPAT म्हणजे काय?
निवडणुकीदरम्यान मतदाता एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करत असतो. आपण ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्यालाच ते मिळाले की नाही याची शहानिशा करण्यासाटी VVPAT मशीनचा वापर केला जातो. तसेच सर्वत्र ईव्हीएम मशीनद्वारे मतदान होते. मात्र या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी केली जाऊ शकते.




























































