
-
राजेश शृंगारपुरे [email protected]
आय. जी. कृष्णप्रकाश पोलीस अधिकारी या ओळखीव्यतिरिक्त आयर्नमॅन, अल्ट्रा मॅन ही त्यांची स्वतःची ‘पॅशनेट’ ओळख.आज तुमच्या भेटीस असेच एक ‘अल्ट्रामॅन’, ‘आयर्न मॅन’ किताब पटकावलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणले आहे.
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश. आजवर विविध गुन्हे आणि गुन्हेगार यांचा अचूक वेध घेणारे कृष्णप्रकाश आयर्न मॅन, अल्ट्रामॅन हा किताब पटकावणारे पहिलेच आयपीएस अधिकारी. कृष्ण सर यांना त्यांच्या या शौर्यामागचे गुपित विचारले असता ते म्हणाले की, ‘‘वय हे फक्त शारीरिक परिपक्वतेसाठी असते. जर आपल्याजवळ दृढ इच्छा असेल तर जगात काहीही करणे अशक्य नाही.’’ त्यांनी लिहिलेल्या कवितेतूनच त्यांच्यातील वज्रनिर्धार दिसतो.
‘‘मन के अंदर का एक लोहा गलता,
तब तन के उपर एक लोहा ढलता
भीतर-बाहर चारों पहर
जिसके फौलादी इरादे पलता।
गिरता उठता कभी ना रुकता,
अनवर्थ है जो चलता रहता।
जख्मों को जो हंसकर सेहता,
प्रेरक इतिहास वही है रचता।।
पोलीस ठाण्यात त्यांच्या कर्तबगारीला सलाम करीत त्यांना ‘सिंघम’ असे संबोधले जाते. सध्या ते आयजी, व्हीआयपी सिक्युरिटीज म्हणून कार्यरत आहेत.
झारखंड येथील हजारीबाग हे त्यांचे मूळ गाव. वयाच्या 12-13व्या वर्षांपासून ‘धावणे’ हा मुख्य व्यायाम त्यांनी सुरू केला. तसेच विरंगुळा म्हणून तेथील कन्हेरी लेकमध्ये पोहायला जात असत. शिकलेली कोणतीही चांगली गोष्ट कधी वाया जात नाही ते अगदी खरे. पुढे धावणे, सायकल चालवणे, पोहणे हे व्यायाम प्रकार नित्यनियमाचे झाले.
पोलीस अधिकारी म्हणून काम करताना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नव्हता. त्यानंतर त्यांची बदली गडचिरोली येथे झाली. तिथे नदीत पोहणे, धावणे हा नित्य व्यायाम प्रकार निरंतर राहिला… इथे एक गोष्ट कृष्ण सर यांनी खास नमूद केली ती म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज धावले पाहिजे तसेच आपल्या निवासस्थानाजवळ एखादी जीम असल्यास तिथे जाऊन व्यायाम केला पाहिजे.
मात्र कृष्ण सर यांची मॅरेथॉन दौड सुरू झाली ती मुंबईत… 2012मध्ये मुंबईतील दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पदभार हाती घेतला. या भागात दरवर्षी मॅरेथॉन आयोजित होत असे. बंदोबस्ताच्या जिकरीच्या जबाबदारीमुळे या वर्षात त्यांनी मॅरेथॉनमध्ये धावण्याविषयी विशेष रस घेतला नाही. मात्र पुढे 2013 मध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. वांद्रे रिक्लमेशन येथून सुरू झालेली सात किलोमीटरची ड्रीम रन ही मॅरेथॉन कृष्ण सरांनी काही वेळात पूर्ण केली. आझाद नगर पोलीस चौकीत युनिफॉर्म परिधान केला आणि पुन्हा बंदोबस्ताला लागले. 2016 मध्ये सातारा हिल मॅरेथॉन होती. त्यावेळेस त्यांच्या पायाच्या गुडघ्यांमध्ये त्रास उद्भवला. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला तसेच धावणे बंद करण्यास सांगितले. या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही. इथे त्यांनी एका बाबाचा सल्ला घेतला. थोडे हसून ते म्हणाले, “गुरूबाबा नव्हे तर गुगलबाबा’’ म्हणजेच गुगल. त्यांना झालेल्या गुडघेदुखीबाबत गुगलवरील माहितीच्या आधारे आपला धावण्याचा फॉर्म बदलला. आहार, पाणी यात गरजेनुसार बदल केले. ‘ऍसेडिक बॉडी’चे अल्कलाइन बॉडीत रूपांतर केले. मालेगावच्या अमन मॅरेथॉन स्पर्धेनंतर त्यांची भेट त्यांच्याच एका डॉक्टर मित्राशी झाली. त्याचा 23 वर्षांचा मुलगा हाफ आयर्नमॅन स्पर्धेची तयारी करीत असल्याचे कळले. त्यापासून प्रेरित होत त्यांनी फुल आयनमॅन स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. आता तीन ते साडेतीन महिन्यांत तयारी करायची होती. फूल आर्यनमॅन या स्पर्धेत 186 कि.मी. सायकलिंग, 4 कि.मी. स्विमिंग आणि 42 कि.मी. रनिंग हे क्रीडा प्रकार 16 तासांत पूर्ण करायचे असतात. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे होते. इथून सुरू झाली खरी कसोटी. 3 वाजता उठून पोहण्याचा प्रवास, नंतर सायकलिंग आणि त्यानंतर 5 कि.मी. धावणे असा नियमित सराव केला. मुंबईवरून रात्री बारा वाजता नाशिककडे रवाना. तेही सायकलवरून. मग सकाळी मानस लेकमध्ये पोहण्याचा सराव अशी जबर मेहनत घेत. कोणत्याही प्रशिक्षकाची मदत न घेता. आणि फ्रान्समध्ये झालेल्या ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत कृष्णप्रकाश ‘आयर्न मॅन’ झाले.
‘वेस्ट मधून बेस्ट’
कुप्रसिद्ध चंदनतस्कर वीरप्पनच्या मृत्यूनंतर त्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, वीरप्पनच्या शरीरातील अवयव हे एका सुदृढ अवस्थेतील 25 वर्षांच्या मुलासारखे स्वस्थ होते. तसा उल्लेख कश्मीरचे सिक्युरिटी ऍडवायझर के. विजयकुमार यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात हजर असलेल्या कृष्ण सर यांच्या कानावर ही गोष्ट आली. अंगात वीज संचारावी तसे ते शहारले. त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला. हा अट्टल गुन्हेगार जर इतका फिट होता, तर मग आपण त्याहीपेक्षा फिट झाले पाहिजे. ग्रेट…
फिटनेसची दुसरी कसोटी- ‘अल्ट्रामॅन’
दरवर्षी ऑस्ट्रेलियात तीन दिवसांच्या 515 कि.मी.च्या मल्टिस्पोर्ट रेसचे आयोजन होते. ही मल्टिस्पोर्ट रेस तीन दिवसांत तीन टप्प्यांत विभागण्यात येते. यात 10 कि.मी. समुद्रात पोहणे, त्यानंतर 421 कि.मी. क्रॉस-कंट्री सायकल आणि शेवटी 84 कि.मी अल्ट्रामॅरेथॉन धाव, या सर्व स्पर्धा निर्धारित वेळेच्या मर्यादेत पूर्ण कराव्या लागतात.
वयाच्या 48व्या वर्षी कृष्णप्रकाश यांनी ट्रायथलॉनचा ‘अल्ट्रामॅन’ हा किताब जिंकला आणि 34 तास 21 मिनिटांमध्ये संपूर्ण शर्यत पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. या महत्त्वाकांक्षी शर्यतीचे जेतेपद पटकावण्याच्या केंद्रस्थानी होता तो त्यांचा व्यायाम. या स्पर्धेच्या वेळी त्यांना वेदनादायी अनुभवातून जावे लागल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेपूर्वी सायकल सरावादरम्यान साताऱ्यातील वाई या गावानजीकच्या पसरणी घाटात त्यांच्या सायकलला अपघात झाला. शरीरातील तीन हाडे फ्रॅक्चर झाली. डॉक्टरांनी सर्व प्रकारचा व्यायाम थांबवला. काही दिवसांची विश्रांती आणि सरावात व्यत्यय यामुळे ते नाराज झाले. मात्र इथेही त्यांची ‘वेस्टमधून बेस्ट’ ही विचारप्रणाली त्यांना धीर देऊन गेली. ती म्हणजे, ईश्वर जर मला इतका पाठीमागे खेचत आहे तर तो मला आणखी लांब आणि उंच भरारी घेण्यासाठी सांगत आहे. राखेतून फिनिक्स पक्ष्याने उंच झेप घ्यावी तसे आत्मविश्वासाने त्यांनी पुनःश्च तयारी करीत दुखणेही बरे केले आणि शर्यतीत उभे राहिले.
व्यायामशाळा, व्यायाम प्रकार आणि योगसाधना
व्यायामशाळेविषयी बोलताना ते म्हणाले, गोल्ड जीम, तळवलकर्स, नायट्रो जीम, सीजीआय क्लब किंवा सरकारी व्यायाम केंद्रे या सगळय़ा ठिकाणी त्यांचे सभासदत्व आहे. व्यायामाचा मुख्य फायदा म्हणजे जेव्हा जेव्हा आपण टार्गेट पूर्ण करतो तेव्हा आपले डोपामाईन हाय होते, तर जेव्हा आपण धावणे, सायकल चालवणे, पोहणे सुरू करतो तेव्हा आपले व्हिटॅमिन डायक्रिन हाय होते. हे सकारात्मक बदल आयुष्यातील शारीरिक, मानसिक तणाव दूर करतात. एखादे ध्येय आखा, संतुलित आहार, योग्य व्यायाम यांचा अवलंब करून ध्येय गाठा. त्यातून जे समाधान मिळेल तेच तुमचे पारितोषिक असा गोड सल्ला त्यांनी दिला आहे.
या यशात आहाराची मुख्य भूमिका
कृष्णप्रकाश यांच्या फिटनेसमध्ये ‘आहार नियोजन’ हे मुख्य आहे. त्यांनी स्वतःच अभ्यास करून स्वतःचा सकस आहार नियोजित केला आहे. सकाळी कोमट पाण्यात थोडी हळद टाकून ते पिणे. तसेच पुदिना, कोथिंबीरच्या पानांपासून बनविलेले रसयुक्त पाणी. रोज सकाळी 200 ग्रॅम दही. त्यासोबत कधी कधी सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, जवस बी, फ्लॅक्सिड बी, काकडी बिया तसेच प्रोटिनसाठी एग व्हाईट. दुपारच्या जेवणात वेगवेगळय़ा प्रकारच्या भाज्या खातात. सोबत नाचणीची भाकरी, भात-डाळ असा साधा आहार. सुकामेवा, चीज, टोफू हेही आहारात समाविष्ट केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिवसाला चार लिटर पाणी पितात. रेड मीट न खाता मासे खातात. गोड खाणे हे विष खाण्यासारखे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रात्रीचे जेवण सात ते साडेसात वाजण्यापूर्वीच घेतात. अशा प्रकारे ते एक ‘स्मार्ट ईटर’ आहेत. एकंदरीतच त्यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाशी ही एक भेट नक्कीच अविस्मरणीय ठरेल!
























































