वेब न्यूज – डेलफ्लायः आधुनिक ड्रोन रोबोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>स्पायडरमॅन

सध्या जगभरच ड्रोनच्या मदतीने अनेक क्षेत्रांत विविध संशोधन राबवले जात आहे. फोटोग्राफीपासून पिकांवर औषधांची फवारणी करणे, सामानाची वाहतूक, अन्नपदार्थांची डिलिव्हरी अशा विविध ठिकाणी ड्रोन्सची सेवा घेतली जात आहे. आता नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सुनामी, ज्वालामुखीचा उद्रेक अथवा आग, दरड खचणे अशा संकट काळात मानवी प्राणांच्या रक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर शक्य होणार आहे. यासाठी संशोधकांनी कीटकांपासून प्रेरणा घेत लहान कीटकाच्या आकाराचा ड्रोन तयार केला आहे. या ड्रोन रोबोटला कीटकाप्रमाणेच चार स्वतंत्र पंख देण्यात आलेले आहेत. उजव्या बाजूचे पंख वेगाने हलवल्यास उजवीकडे आणि डाव्या बाजूचे पंख वेगाने हलवल्यास डावीकडे वेगाने वळण्याचे तंत्रज्ञान या रोबोटला देण्यात आले आहे. सर्व पंख वरच्या बाजूला वळवत हा रोबोट वरच्या दिशेनेदेखील वेगाने उड्डाण करतो. डेलफ्लाय हे नाव याला देण्यात आले आहे. भूकंपासारख्या दुर्घटनेत इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात. मलब्याखाली अडकलेल्या आणि मदतीची प्रतीक्षा करणाऱयांना शोधण्यासाठी अथवा आगीच्या दुर्घटनेत अडकलेले कार्यालयातील कर्मचारी शोधून त्याच्यापर्यंत मदत पोचवण्यासाठी या रोबोट ड्रोन्सचा उपयोग होणार आहे. या कीटक ड्रोन्समध्ये सेन्सर्स लावलेले असल्याने उडत असताना मार्गात एखादा अडथळा आल्यास तो ते सहजतेने टाळू शकतात किंवा आपला रस्ता पूर्णपणे बदलून लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात. परागीकरणासारख्या कामातदेखील त्यांची मदत घेण्याची शक्कल संशोधक लढवत आहेत. या ड्रोनच्या आकारावरदेखील अजून संशोधन सुरू आहे. आकार अजून लहान करता आल्यास कीटकांच्या झुंडीप्रमाणे या रोबोट्सनादेखील झुंडीने उडवता येणे शक्य होणार आहे.