
सामना प्रतिनिधी, मुंबई
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज शिवसेनेचे पवित्र शिवबंधन तोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंद पडलेले घडय़ाळ मनगटावर बांधले. ‘राजा शिवछत्रपती’ टीव्ही मालिकेत शिवछत्रपतींची आणि आता ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत संभाजी राजांची भूमिका साकारताना भगवा ध्वज खांद्यावर घेतला. पण आता भगव्याचा त्याग करून डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचा ध्वज खांद्यावर घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत संभाजीनगरमधील भाजपचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळाच्या चिन्हाची प्रतिकृती व मफलर भेट दिला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, नवाब मलिक आदी उपस्थित होते.
पवारांच्या गाडीमागे पळायचो म्हणून…
लहानपणी गावाकडे असताना शरद पवार यांना पाहण्यासाठी त्यांच्या गाडीमागे पळायचो, असे कारण कोल्हे यांनी प्रवेशासाठी दिले आहे. त्यावर गाडीमागे पळणारे कोल्हे आता पवारांच्याच गाडीत बसले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली आहे.





























































