किरण रिजीजू रवीनाला म्हणाले, तवांगला या, व्यवस्था करतो! नेटकऱ्यांनी झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गंगटोक

सोशल मीडियावर ट्रोल होणं ही आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. नाहक ट्रोल केल्या जाणाऱ्यांचाही त्यात भरणा आहे. पण, कधी कधी काही जण विशेषतः नेते आणि इतर सेलिब्रिटी स्वतःहून नेटकऱ्यांना आमंत्रण देतात. असाच प्रकार गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्याबाबत घडला आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिला तवांगमध्ये पर्यटन व्यवस्था करून देण्याच्या ट्वीटवरून रिजीजू ट्रोल झाले आहेत.

rijiju-tweet-raveena

अभिनेत्री रवीना टंडन हिने रिजीजू यांना उद्देशून ट्वीट केलं होतं. रवीनाला पतीसोबत गंगटोक येथे जायचं होतं, मात्र अनियमित फ्लाईट्स आणि तिकीटं रद्द झाल्यामुळे हा बेत रहित केल्याचं तिने या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. लवकरच आपण पुन्हा गंगटोकला येऊ असंही ती या ट्वीटमध्ये म्हणाली होती. त्यावर रिजीजू यांनी तिला रिप्लाय देताना सिक्कीमला जाण्याचा बेत उत्तम असून तुम्ही तवांगलाही जाऊन या. तवांगला दोन दिवस मुक्काम केल्यास चांगलं होईल. तुम्ही तुमच्या तारखा सांगा. तवांगला योग्य ती व्यवस्था मी करून देतो, असं रिजीजू म्हणाले.

हे ट्वीट पाहताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. कश्मीरमध्ये चार जवान शहीद झाले आहेत आणि आपले गृह राज्य मंत्री चित्रपट तारकांच्या सुट्ट्यांचे बेत आखण्यात मग्न आहेत. हे गृह राज्यमंत्री आहेत की ट्रॅव्हल एजंट? आताच सांगितलं तर कितीची सूट मिळेल, अशा प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांनी रिजीजू यांना चांगलंच ट्रोल केलं. शेवटी रिजीजू यांना आपलं ट्वीट डीलिट करावं लागलं.