
सामना प्रतिनिधी । पालघर
डहाणूत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला थरथराट अद्यापि थांबलेला नाही. 13 फेब्रुवारी रोजी सात वेळा भूकंपाचे धक्क्यावर धक्के बसले. नैसर्गिक आपत्तीमुळे डहाणू, तलासरीतील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांची झोप उडाली असून अनेक घरांना भेगा पडल्या. सततच्या भूकंपामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला धास्तावल्या असून त्यांच्या रोजगारावरदेखील परिणाम झाला आहे. आज पुन्हा संपूर्ण जिल्ह्यालाच भूकंपाचा तडाखा बसला आहे. सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी 4.3 रिश्टर स्केलचा धक्का बसला. गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक मोठ्या भूकंपाची नोंद झाली आहे. सततच्या भूकंपामुळे ग्रामस्थांना या धक्क्यांची सवय झाली असली तरी हा थरथराट आता जिवावर उठू लागल्याने येथील पूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे.
सुदैवाने विद्यार्थी नसल्याने दुर्घटना टळली
डहाणूतील धुंदलवाडी गावात गेल्या तीन महिन्यांत भूकंपाचे सर्वाधिक धक्के बसले आहेत. या ठिकाणी भूकंपाच्या तडाख्याने आश्रमशाळेमधील वर्गखोली पडल्याने विद्यार्थी कापडाच्या तंबूमध्ये शिक्षण घेत आहेत. याप्रमाणेच डहाणू तालुक्यातील भूकंपप्रवण क्षेत्रातील अनेक शाळा बंद करून त्या ठिकाणच्या मुलांना उघड्यावर टेंट बांधून शिक्षण दिले जात आहे. आज बसलेल्या सर्वात मोठ्या धक्क्याने पालघरमधील एका बंद शाळेची भिंत कोसळली. जर ही शाळा सुरू असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
जिल्ह्याची किनारपट्टी आज पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार तडाख्याने हादरली. डहाणू, तलासरी व पालघर तालुक्यात सकाळी 11.15 वाजता 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तब्बल दोन ते तीन मिनिटे ही थरथर सुरू होती. त्यामुळे शेकडो घरांसह काही शाळांनाही तडे गेले असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. या जबरदस्त हादर्याने विद्यार्थी शाळेबाहेर पळाले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वारंवार बसणार्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.
विक्रमगडलाही सौम्य धक्का
विक्रमगड तालुक्यातील चाबके, तलावली,पाचमाड,करसोड,वेहेलपाडा या भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यामध्ये काशिनाथ तांबडा, जयराम हाडळ, नवश्या हाडळ, रमण कोरडा यांच्या घराला तडे गेले. घटनेची पाहणी करण्याकरिता विक्रमगडचे तहसीलदार श्रीधर गालीपिल्ली यांनी पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले.
- भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यात असून पाच किलोमीटर खोल भूगर्भात आहे. त्याचा व्यास2 अक्षांश व 72.8 रेखांश इतका आहे.
- भूकंपाचा धक्का बसताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना तत्काळ मोकळ्या जागेवर आणण्यात आले, तर शासकीय कार्यालयांमधील कर्मचारीही जिवाच्या आकांताना बाहेर पळाले.
- दहावीचे विद्यार्थी वेळेचे गणित जुळवत पेपर लिहीत असतानाच दोन ते तीन मिनिटे भूकंपाने थरथर सुरू होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही काही काळ घाबरून गेले.
- पालघरच्या वडराई, माहीम, केळवा, नांदगाव, सालवड, तारापूर-चिंचणी, हळदपाडा, डहाणू, बोर्डी या भागात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले.
17 दिवसांत 600 धक्के
पालघर परिसरात भूकंपाचे धक्के गेल्या अनेक वर्षांपासून बसत असून गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पाच विविध यंत्रांद्वारे नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार गेल्या 16-17 दिवसांमध्ये सुमारे 600 सूक्ष्म भूकंप झाले असून त्यातील 3.9 रिश्टर स्केलचा धक्का हा सर्वात मोठा धक्का होता. पण आज सकाळी 11 वाजून 14 मिनिटांनी 4.3 रिश्टर स्केलचा धक्का नोंदवण्यात आला. भूकंपाने पालघर परिसरातील 22 कि.मी.चे क्षेत्र प्रभावित झाले असून 15 कि.मी.चा पट्टा याच्या प्रभावाखाली आला आहे. मात्र या सर्व नैसर्गिक घटना असल्याचेही या नोंदीत दिसून आले आहे.
घडामोडींची नोंद
पालघरमधील भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी एनजीआरआय व भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात भूकंप सूचना यंत्र (सिस्मोग्राफ) बसविले आहेत. याद्वारे जिल्ह्यात घडणार्या भूकंपविषयक घडामोडींची नोंद ठेवण्यात येत आहे. अलीकडे झालेल्या भूकंपाच्या घटनांची नोंद घेऊन एनजीआरआयने काढलेले निष्कर्ष बैठकीत मांडण्यात आले. त्यानुसार या परिसरात घडणार्या भूकंपाच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या सर्व नैसर्गिक घटना असल्याचेही या नोंदीत दिसून आले आहे.
स्थानिकांना प्रशिक्षण
वारंवार होणार्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी घाबरून न जाता काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण जनतेला देण्यात यावे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्यासाठीचे प्रचार व प्रसिद्धी साहित्य ‘एनजीआरआय’ने तयार केले असून त्याचा वापर करावा, असे आवाहन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अभ्यासासाठी समिती
पालघरमधील भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबईचे प्रा. रवी सिन्हा यांची नेमणूक केली आहे. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, आयआयटी मुंबईचे प्रा. अलोक गोयल, नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे संचालक व्ही. के. गेहलोत, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. व्ही. व्ही. भोसेकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, भूकंपशास्त्रतज्ञ डॉ. श्रीनागेश डी. आदींचा समावेश आहे.






























































