
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलवाडी व पिंपरणवाडी या दोन्ही गावांतील नदीनाल्यांच्या पात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापे टाकून वाळूसह एकूण एक कोटी 15 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर रविवारी दुपारी सोनखेड पोलीस ठाण्यातंर्गत शेलवाडी व पिंपरणवाडी या दोन्ही गावातील नदीनाल्यांच्या पात्रातून वाळूचे अवैधरित्या जेसीबीव्दारे उत्खनन सुरू असून त्याची विनापरवाना चोरटी वाहतूक आणि अवैधरित्या विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, उपनिरीक्षक विनय शेळके, सदानंद वाघमारे व त्यांच्या पथकाने छापा मारला. तेथून पाच ट्रॅक्टर रेती, तीन जेसीबी असा एक कोटी 15 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहने व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, यातील काही आरोपींना मुद्देमालासह सोनखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. यासंदर्भातली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. नांदेड पोलिसांनी वाळू उत्खनन आणि अवैध वाळू वाहतुक आणि विक्रीविरुध्द या वर्षात केलेली ही मोठी कामगिरी आहे.




























































