
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
सोमवारी असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त परळीतल्या वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. रविवारी दुपारपासूनच भाविक परळीत दाखल होत आहेत. रविवारी रात्री 12 पासून महाशिवरात्रीच्या पावन पर्वाला सुरुवात होणार आहे. यासाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली असून,पास धारकांची वेगळी रांग असेल.मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर शनिमंदिराजवळ दर्भन पासचा स्टॉल उभारण्यात आला असून पासचे मूल्य 100 रुपये आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांना अभिषेक करता येणार आहे. एका आवर्तनासाठी 100 रुपये तर सपत्नीक अभिषेकासाठी 150 रुपयांची पावती देवस्थानकडून घ्यावी लागणार आहे. वैजनाथच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी येत असल्याने भक्तांच्या दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टकडून विशेष सोय करण्यात आली आहे.मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग करण्यात आली असून भव्य मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिराला विद्युत रोशनाईही करण्यात आली आहे. मंदिर परिसरात 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही असणार आहे.
रविवारी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्याहस्ते श्रींचा शासकीय रुद्राभिषेकानंतर भक्तांना अभिषेक करता येणार आहे. सोमवारी रात्री 10 ते 12 यावेळेस (मंदिर बंद होईपर्यंत परळीच्या स्थानिक भाविकांना आपले आयडी प्रूफ दाखवून दर्शन करता येणार आहे. रात्री 10 नंतर दर्शन पासच्या रांगेतूनच दर्शनासाठी जायचे असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.






















































