
सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली
मागील तीन दशकांपासून हिंदुस्थानी बाजारपेठेत अग्रगण्य स्थानी असलेल्या मारुती कंपनीने प्रसिद्ध ऑफ रोड कार मारुती सुझुकीची निर्मिती बंद केल्याचे जाहीर केले आहे. मारुतीने सर्व डिलर्संना ई-मेल करून ही माहिती दिली असून नव्या बुकिंग ऑर्डर्स न घेण्यास सांगितले आहे.
विविध गाडय़ांच्या जीएस 500 कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकीच्या जिप्सी गाडय़ांची मोनोपॉली आहे. ही कॅटेगरी 500 किलोग्रॅमच्या लोडिंग गाडय़ांची असते. सरकारने आता जीएस 800 कॅटेगरीची वाहने सुरू केली आहेत. मात्र लष्कराच्या वतीने जीएस 500 कॅटेगरी बंद करण्याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मारुतीने 1985 साली जिप्सी गाडी लॉन्च केली. सुरुवातीच्या वर्षात जिप्सीला चांगली लोकप्रियता मिळाली. डिझेलवर चालणारी एसयूवी आल्यानंतर ही जिप्सी केवळ सैन्यदलापुरती मर्यादित राहिली.
मारुतीला जिप्सीची पहिली ऑर्डर 1991 मध्ये सैन्यदलाकडून मिळाली. मारुतीने सैन्यदलाला 35 हजारांहून अधिक जिप्सी गाडय़ा पुरविल्या आहेत.
मारुतीला जिप्सीची सर्वात मोठी ऑर्डर गेल्यावर्षी मिळाली. सैन्यदलाने 4000 युनिटहून अधिक जिप्सी गाडय़ा घेतल्या.


























































