पोलिसांनो, विचार बदला, आयुष्य बदलेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

सतत बंदोबस्त व गुन्हेगारांच्या मागे असणारे पोलीस कायम तणावाखाली असतात. अशा पोलिसांना आज माइंड ट्रेनिंगची गरज आहे. हे लक्षात आल्यावर प्रसिद्ध माइंड ट्रेनर संदीप चोणकर यांच्या ‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ या संकल्पेनवर आधारित जन सहयोग फाऊंडेशनच्या वतीने एक शिबीर उत्तर मुंबईमधील पोलिसांसाठी कांदिवली येथे आयोजित केले होते. त्यास पोलिसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्व येथील एका सभागृहात 25 ते 28 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केलेल्या शिबिरात 100 पोलीस शिपायांनी भाग घेतला होता. त्यावेळी काही शिपायांनी आपल्या पत्नींनाही सोबत आणले होते. मानसिक तणाव कसा दूर करावा, लोकांशी कसे बोलावे, संबंध बिघडवण्याऐवजी ते कसे सुधारावेत, आपल्यातील न्यूनगंड व वाईट गुण कसे कमी करावेत, संभाषण कौशल्य कसे वाढवावे, यश कसे मिळवावे याविषयी संदीप चोणकर यांनी आपल्या खुशखुशीत भाषेत उपस्थितांना चार दिवस मार्गदर्शन केले. आमच्यामधील न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न चोणकर यांनी केला असे शिबिरात भाग घेतलेल्या बहुसंख्य पोलिसांनी दै. ‘सामना’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. गुरुवार, 28 फेब्रुवारी रोजी या शिबिराची सांगता झाली. त्यावेळी बहुसंख्य पोलिसांनी जनतेशी सलोखा राखण्यासाठी तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी चोणकर यांच्या माइंड ट्रेनिंगचा आम्हाला भविष्यात खूपच फायदा होईल, असेही बऱयाच पोलिसांनी सांगितले.

जन सहयोग फाऊंडेशनच्या वतीने माइंड ट्रेनिंग सेमिनारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात भाग घेणाऱया पोलिसांना व ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश प्रधान, जन सहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच दै. ‘सामना’चे सहाय्यक संपादक प्रभाकर पवार आदी प्रमुख मंडळी या सांगता सोहळय़ाला उपस्थित होती.