यंदा सीईटीची ऑनलार्ईन परीक्षा; निगेटिव्ह मार्किंग नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

राज्यातील अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र कृषीच्या पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी एमएचटी सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. जेईईच्या मेनच्या धर्तीवर ही परीक्षा होणार असून या परीक्षेत निगेटिव्ह पद्धत राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गुणांची विभागणी जाहीर करण्यात आली आहे.

यंदा सीईटी परीक्षा ऑनलाईन होणार असल्याचे अभ्यासक्रम आणि गुणांची पद्धत यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. गेल्यावर्षीप्रमाणे सीईटी अभ्यासक्रमाची रचना व स्वरुप राहणार आहे. विशेष म्हणजे जेईई प्रमाणे निगेटिव्ह मार्कींग पद्धत राहणार नाही. या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या 11 वी अभ्यासक्रमातील 10 प्रश्न आणि 12 वीच्या अभ्यासक्रमातील 40 प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी 90 मिनीटांचा कालावधी राहणार आहे. प्रत्येक पेपर 100 गुणांचा राहणार आहे. अभ्यासक्रमात कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे याची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. यंदा प्रथमच ऑनलाईन सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुणांची विभागणी कशी असणार आहे, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन सीईटीला समोरे जाण्याची तयारी करावी लागेल. परभणीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने परभणी आणि नांदेड ही दोन परीक्षा केंद्रे राहण्याची शक्यता वर्तविली जात असून परभणीत सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणाने काही विद्यार्थी नांदेडला परीक्षेस बसणार आहेत. प्रवेश अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 23 मार्च आहे.

अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र व कृषीच्या पदवी अभ्यासक्रम प्रथमवर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत होती. परंतु यंदाची सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत सीईटी सेलद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार ऑनलाईन स्तरावर घेण्याबाबत सीईटी सेलद्वारे विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्या प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, सीईटी सेलद्वारे परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. 12 वीची परीक्षा सध्या अंतिम टप्प्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना आता नीट आणि सीईटी या परीक्षेचे वेध लागले आहेत.

परभणीला नीटचे सेंटर व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली होती. शिवाय येथे सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेरगावी परीक्षेसाठी जावे लागत आहे. पालकवर्गातून सीईटी आणि नीटच्या परीक्षेसाठी परभणीकरीता परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी मागणी सर्वस्तरातून जोर धरु लागली आहे.