तुमचे मत कुठे जातेय हे आधीच पाहा! शरद पवारांचा कार्यकर्त्यांना खबरदारीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

सामना प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या 7-8 मार्चला जाहीर होतील. आपल्याकडचे मतदान एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पार पडेल, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘ईव्हीएम’बाबत खबरदारीचा इशारा दिला. ईव्हीएमचे जे बटण दाबले त्यालाच मतदान होते की नाही याची खातरजमा निवडणुकीच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता मतदान केंद्रात जाऊन करून घ्या, असे पवार यांनी बजावले. ते नाशिक लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. नाशिकच्या चोपडा लॉन्स येथे हा मेळावा पार पडला.

निवडणूक यंत्रणेबाबत शंका नाही. पण केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या भूमिकेबाबत संशय जरूर आहे, असे सांगून पवार यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. मोदी सरकार ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्याविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

मतदान यंत्रांमधील घोळ यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील भंडारा येथील पोटनिवडणुकीत याचा अनुभव आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर संबंधित कार्यकर्त्यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी आपल्यासमोर मतदान यंत्राची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपाच्या हाती पुन्हा सत्ता आली तर लोकशाही शिल्लक राहणार नाही, असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांनी सत्तेचा उपयोग जनतेसाठी केला, उत्तम विकास केला. त्यांचे नेतृत्व उत्तम असून नाशिक लोकसभेचा ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे काम करावे, असेही त्यांनी शेवटी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना सांगितले.

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारमुळे नाशिकची प्रगती खुंटल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. आता हिंदुस्थानी लष्कराच्या शौर्याचे श्रेय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करीत आहेत. पाकिस्तान त्यांना घाबरल्याचे सांगत आहेत. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान हे जर खरोखर मोदींना घाबरत असतील तर दोन वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले हिंदुस्थानचे कुलभूषण जाधव यांची मोदींनी सुटका करावी, त्यांना हिंदुस्थानात आणावे, असे आवाहन भुजबळ यांनी मोदी यांना केले.

या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, अपूर्व हिरे आदींची भाषणे झाली. माजी मंत्री प्रशांत हिरे, हेमंत टकले, नरहरी झिरवाळ, रवींद्र पगार, अर्जुन टिळे, नाना महाले, रंजन ठाकरे, कैलास कमोद, गजानन शेलार, जयंत जाधव, भारती पवार, विजयश्री चुंबळे आदी या वेळी हजर होते.