सामना प्रतिनिधी । मुंबई
बेकायदा कामांच्या बदल्यात पालिका अधिकार्यांना मुंबईतील क्लब आणि जिमखान्यांमध्ये लाइफटाइम मेंबरशिप मिळत असल्याचा गंभीर आरोप करीत आज सर्वपक्षीयांनी थेट काही पालिका अधिकार्यांची नावेच महासभेत उघड केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करून सभागृहात अहवाल सादर करावा असे आदेश पालिका प्रशासनाला दिले.
मुंबईतील अनेक क्लब आणि जिमखान्यांमध्ये पालिका अधिकारी नियमबाह्य कामांकडे दुर्लक्ष करतात. काही ठिकाणी एक-दोन वेळा कारवाईही केली जाते, मात्र यानंतर संबंधित अधिकार्यांना त्या क्लबची लाइफटाइम मेंबरशिप मिळत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. अशा प्रकारे मेंबरशिप घेणार्या अधिकार्यांची चौकशी करून मेंबरशिप रद्द करावी अशी उपसूचना कोटक यांनी मांडली. महालक्ष्मी येथे 100 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्या जिमखान्यात सर्वसामान्य अधिकारी आणि नगरसेवकांनाही मोफत प्रवेश द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीदेखील कोटक यांच्या उपसूचनेचे समर्थन करीत अशा प्रकारे मेंबरशिप मिळवलेल्या अधिकार्यांवर चौकशी करावी आणि मुंबईतील सर्व क्लब, जिमखान्यांमध्ये किती पालिका अधिकार्यांनी मेंबरशिप मिळवली याचा अहवाल द्यावा अशी मागणीही केली. यावेळी सपाचे रईस शेख यांनीदेखील पालिका अधिकार्यांनी मेंबरशिप मिळवलेल्या क्लबमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे नियम पायदळी तुडवले असल्याचे सांगितले.
अधिकार्यांची नावे
वरळीतील ‘एनएससीआय’ क्लबमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे, उपायुक्त चंद्रशेखर चोरे क वॉर्ड अधिकारी देवेंद्र जैन यांना लाइफटाइम मेंबरशिप देण्यात आली आहे.




























































