
सामना प्रतिनिधी । मुंबई
सोरायसिसच्या एकूण रुग्णांपैकी 43 टक्के जणांनी या आजाराचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर होत आहे. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असून 15 टक्के महिलांच्या त्वचेवर सोरायसिसची लक्षणे दिलसल्याने त्यांच्या जोडीदारांनी त्यांच्यासोबतचे नाते तोडले आहे. सोरायसिस झालेल्यांसोबत त्यांचे जोडीदार जवळीक टाळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोरायसिस झालेल्या रुग्णांना त्यांच्या नातेसंबंधांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. सैफी हॉस्पिटल त्वचारोगतज्ञ डॉ. शहनाझ अर्सीवाला म्हणाल्या, सोरायसिसमुळे महिला रुग्णांमध्ये कमालीचा ताण निर्माण होऊन भावनिक आघातही होतो. याचा सामना करण्यासाठी एकांतवासात जाणाऱ्या अनेक स्त्रिया आम्ही बघितल्या आहेत. अर्थात ज्या स्त्रियांना त्यांच्या कुटुंबाचा तसेच मित्रमंडळींचा आधार असतो, त्या या परिस्थितीचा सामना अधिक चांगला करू शकतात. असे रुग्ण अधिक चांगल्या पद्धतीने उपचार घेतात आणि उपचारांचे परिणाम त्यांच्यावर अधिक चांगले होतात, असे निरीक्षण असल्याचे त्या म्हणाल्या.या स्त्रियांना भावनिक आधाराची गरज असते. त्यांच्या पाठीशी कुटुंबाने ठामपणे उभे राहायला हवे, असे डॉ. शहनाझ म्हणाल्या.





























































