साहित्यलक्ष्मीची लेखणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजया वाड, [email protected]

स्मृतीचित्रे. मराठी सारस्वतातील देखणे, मानाचे पान. आचार्य अत्र्यांनी दिलेली ‘साहित्यलक्ष्मी’ ही उपाधी लक्ष्मीबाई टिळकांना अगदी सार्थ लागू होते.

स्मृतिचित्रे या पुस्तकातली भाषा साधी, घरगुती, प्रसंगही रोजच्या जीवनातले नि तरीही 512 पानांचे हे पुस्तक वाचल्यावर, संपले? अशी चुटपुट लागते. मराठी भाषेच्या बागेतले हे शेवग्याच्या शेंगाचे झाड आहे. ज्या शेंगाची चव चोखून खाल्ल्यावर दीर्घकाळ मुखात राहाते. मी काही नमुने प्रिय वाचकांसाठी पेश करते. ते वाचल्यावर कधी एकदा हे पुस्तक वाचतो असे होईल. त्या उलटून गेलेल्या जुन्या काळाशी नाते जोडतो असे वाचकांना होईल. वाचा, लक्ष्मीबाई लिहितात ‘माझ्या सासूबाईंना मी कधी प्रत्यक्ष पाहिले नव्हते, परंतु त्यांच्या चरित्रातील व टिळकांच्या पूर्वेविहासातील ज्या गोष्टी मी ऐकल्या आहेत त्या थोडक्यात येथे दिल्यास ते अस्थानी होणार नाही असे वाटते. माझ्या माहेरी माझ्या आईची जी गत होती तीच सासरी सासूबाईंची होती. टिळक व महादेवभाऊजी तर मामंजींचे नावडते होतेच व माझ्याजागी मी येण्याआधी सासूबाई नावडत्या होत्या. सासूबाई नावडत्या असण्याची दोन-तीन कारणे होती. पहिलं म्हणजे त्या कविता करीत. त्यांच्या कविता मामंजी जाळून टाकीत. मामंजींच्या संतापाग्नीतून व खऱयाखुऱया अग्नीच्या जबडय़ातून सासूबाईंच्या कवितेतील फक्त दोनच ओळी आतापर्यंत टिकल्या आहेत. त्या दोन ओळी अशा होत्या.

ही चिंधीची अल्प बाहुली प्रताप हिचा पहा।
बाळपणापासून शिकवी मुलींना संसार हा।।

टिळकांना कवितेचे बाळकडू येथेच मिळाले म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आई कविता करते व लिहिते म्हणून दादा तिचा राग करतात, दादा आपलाही राग करतात, म्हणूनच प्रतिक्रिया म्हणून टिळकांचे आपल्या आईवर व कवितेवर सर्वात अधिक प्रेम असावे.’

काय काळ होता ना वाचकांनो? मराठी सारस्वताचे मानाचे पान म्हणजे कवी ना. वा. टिळक त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक! स्मृतिचित्रातून पूर्वीच्या काळाचे मनोज्ञ दर्शन वाचकांना घडते. आता 21 व्या शतकात, बायकोच्या कविता फाडणारा नवरा… नि मूग गिळून गप्प बसणारी बाई, अभावानेच बघावयास मिळेल. स्मृतिचित्रांची विभागणी 3 भागांत केली आहे. पहिल्या भागात सासूरवास, नथीतील मोती, टिळकांचा धंदा – माझे शिक्षण, धर्मांतर, धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे… ही प्रकरणे वाचता वाचता वाचक लक्ष्मीबाईंच्या त्या साध्यासुध्या, पण अतिशय हृदयस्पर्शी लेखणीच्या प्रेमात पडतात आणि हृदयाची भाषा मुळी अलंकारीक नसतेच; हे आपणही जाणतो.

स्त्र्ााrने किती पारदर्शी असावे, पतीवरील प्रीतीचे उत्कट भक्तीत कसे रूपांतर व्हावे नि ते सांगण्याचा पारदर्शीपणा स्वभावात असावा हे सारेच मनावर गारूड करणारे लेखन लक्ष्मीबाईंचे आरस्पानी प्रतिबिंब मनात उभे करते.

दुसऱया भागात हे प्रकरण येते. या भागातील मैना तुझा पिंजरा गं मायेचा, हे तुझे लाड, माझे शिक्षण, दीक्षा ही प्रकरणे उत्कट आणि वाचनीय झाली आहेत.

त्या काळात दूर असलेल्या लक्ष्मीबाई आपल्या नवऱयाला फक्त ‘कविता’ पत्रे लिहित याचे दाखले लक्ष्मीबाईंनी पुस्तकात उद्धृत केले आहेत. आपण बुद्धीने ख्रिस्ती झालो, पण मनाने ख्रिस्ती होण्यास पुढे दहा-बारा वर्षांचा काळ जावा लागला असे टिळक म्हणत. पण मन तळमळत होते. टिळक आतआत झुरत होते. 1906 साली त्यांनी लिहिलेले एक गीत लक्ष्मीबाईंनी दिले आहे. ते वाचून टिळकांची तगमग लक्षात येते. त्याची चाल आरती ज्ञानराजाची आहे असे त्या नमूद करतात, त्यातल्या दोन ओळी अशा आहेत.

‘शेवटी प्रभूराया। बिलगलो तुझिया पाया
गेले रे गेले माझे । आजवरी जन्म वाया।’

दोघे परत एकत्र सहजीवन जगू लागले तेव्हा त्या लिहून जातात, ‘टिळकांच्या विचाराभोवती कुंपण पडले की त्यांना बाहेरच्या जगाची दाद नसे. ते विद्वान, मी विनोदी; पण त्यांची विद्वता माझ्या विनोदाच्या आड येत नसे व माझा विनोद त्यांना त्रास देत नसे.’

तिसऱया भागातल्या बालकवी ढोंबऱयाच्या आठवणी दिलखेचक झाल्यायत. एकदा टिळक फिरतीवर गेले असताना ठोंबरे घरी आला. म्हणाला, ‘एक ज्योतिषी भेटला होता. तो म्हणाला तुम्ही अपघातात मरणार नि आजच मरणार!’ तेव्हा लक्ष्मीबाईंनी त्यास बाहेरच जाऊ दिले नव्हते. दोन रुपयांची मिठाई आणून सारी रात्र करमणुकीत जागून काढली. मग त्या लिहितात, भविष्य त्या वेळेस खोटे ठरले, पण पुढे पाच वर्षांनी खरे ठरले.

उभ्या आयुष्याचे वस्त्र अनेक धाग्यांनी विणले जाते. लक्ष्मीबाईंचे लग्न टिळकांशी झाले तेव्हा त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या नि पती 17-18 चे होते. तेव्हापासूनचे नाते जणू महावस्र! त्या वेळी नवऱयाने लग्नात रुसावे नि दोन तोळय़ांची सोन्याची अंगठी मागावी हा सासरघरचा फतवा भुकेपुढे कसा वितळला ते वाचाच पुस्तकात. प्रिय वाचकांनो, त्या त्या काळाचे समाजस्थितीचे कवडसे पुस्तकात उमटतातच, उमटत राहतात. एकत्र कुटुंबात जशी छळणूक, पिळणूक होती तशी मन जपणारी, मनाला उभारी देणारी, मायेची गोधडी पांघरणारी हळूवार मनाची माणसेही होती की! त्या सर्वांची स्मृती म्हणजे स्मृतिचित्रे! अवश्य वाचा.

स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
प्रकाशक – समन्वय प्रकाशन, कोल्हापूर
आवृत्ती – मे 2012 z पृष्ठs – 512
मूल्य – रुपये 450/-