पाचूचा राजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी, [email protected]

हिरवा कंच पाचूचा अवघा रंग या वेडय़ा राघूने अंगावर पांघरलाय…

मी नेहमीच ताडोबा वाईल्ड लाइफ सफारीसाठी जाते. या वेळीही सफारीची सुरुवात झाली आणि सर्वजण उत्कंठेने वाघाची प्रतीक्षा करू लागले. वाघाचे दर्शन होण्याचे मात्र चिन्ह दिसेना. अचानक मंजुळ किलबिलाट ऐकू आला व माझा कॅमेरा आपोआपच आवाजाच्या दिशेला फिरला. एका काटेरी फांदीवर हिरव्यागार रंगाच्या पक्ष्यांची जोडी पाहून मी हरखूनच गेले. पाहता क्षणी त्याला जवळ घ्यावेसे वाटले. आजच्या तरुणाईच्या भाषेत बोलायचे तर… ‘ओ… क्यूट…’ असा हा वेडा राघू!!! माझ्या छायाचित्रीकरणाच्या वेडामध्ये या वेडय़ा राघूचे स्थान खूप वरचे आहे.

या पक्ष्याची लांबी साधारण 17-18 सें.मी. आहे. शेपटीवरील मध्यवर्ती पिसांची जोडी लांबवर 5 सें.मी. गेलेली असते. पिल्लांमध्ये शेपटीवर ही पिसांची जोडी नसते. नर व मादी दोघेही सारखेच दिसतात. त्यांच्या पंखांचा पिसारा तेजस्वी हिरवा असून गळ्याभोवती निळसर छटा असते. मुकूट आणि वरचा भाग तांबूस तपकिरी असतो. उडताना त्याचे पंख तांबूस-तपकिरी व हिरव्या रंगाचे दिसतात आणि कडा मात्र काळी दिसते. डोळ्यासमोरून पाठीमागे एक काळी रेष असते. पाय गडद राखाडी, चोच काळी व डोळे किरमिजी रंगाचे असतात. त्यांचे पाय कमकुवत असल्यामुळे पायाची तिन्ही बोटे जोडलेली असतात. दक्षिण-पूर्व आशियाई पक्ष्यांमध्ये मुकूट व चेहरा तांबूस तपकिरी असून आतील भाग हिरव्या रंगाचा असतो, तर अरेबियन पक्ष्यांमध्ये मुकूट हिरवा व चेहरा आणि आतील भाग निळा असतो.

या पक्ष्यांचे वास्तव्य हिंदुस्थानात सर्वत्र आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडे, आशिया खंडामध्ये उष्ण कटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात, युरेशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील बेटांवर सुद्धा हे पक्षी आढळतात. कीटक, विशेषतः मधमाशी, गांधीलमाशी, नाकतोडे आणि मुंग्या हे त्यांचे मुख्यत्वे खाणे असते. शहरे, शेते, बगिचे, कुरणे, झाडेझुडुपे, जंगले सर्वत्र हे पक्षी दिसतात. पाण्याच्या साठय़ापासून ते खूप दूरही राहू शकतात हेच त्यांचे वैशिष्टय़ आहे. हे पक्षी स्थानिक असले तरी काहीवेळा ऋतू बदलताना स्थलांतरित होतात. हे पक्षी कोतवाल, बगळे, मैना अशा सर्व पक्ष्यांमध्ये मिसळणारे आहेत. कधी कधी 25-30 पक्ष्यांचा थवा एकत्र उडताना दिसतो, तर कधी झाडाच्या फांदीवर ते एकत्र बिलगून बसतात. कीटकांवर अतिशय मोहक व आकर्षक पद्धतीने, क्रमवारीने झडप घालतात. खाण्याअगोदर कीटकांना फांदीवर चिरडून मगच गिळतात. पिसे फुगवून व डोके पंखांमध्ये दडवून छोटय़ा छोटय़ा समूहाने हे पक्षी एकत्र फांदीवर झोपतात. या पक्ष्यांबद्दल अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की, यांना माणसांच्या हालचालींचा अचूक मागोवा लागतो व त्याप्रमाणे आपला ठावठिकाणा लपवून ते घरटय़ांची काळजी घेतात. असे अंतर्ज्ञान फक्त ‘आर्चबिशप’ यांच्याकडे आहे अशी समजूत होती.

या पक्ष्यांचा प्रजनन ऋतू मार्च ते जून दरम्यान असतो. वाळूच्या किनाऱयावर नर एकटेच घरटे बांधतात. त्यांचे घरटे 5 फूट लांब एखाद्या बोगद्यासारखे असून, शेवटी रुंद भाग तयार केलेला असतो व तिथे मादी 3-5 अंडी घालते. ती गोलाकार, पांढरी व चकचकीत असतात. पावसाचे प्रमाण व त्यांचे खाणे त्यानुसार अंडय़ांचा आकार बदलतो. नर, मादी दोघेही मिळून अंडी उबवतात आणि साधारण 14 दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. त्यांची 3-4 आठवडे काळजी घेतल्यानंतर ती घरटय़ाबाहेर पडून आकाशात उडायला लागतात.

ताडोबाप्रमाणेच, ससन गीर, राजाजी अशा अनेक जंगलात ‘निळ्या शेपटीचा राघू’, ‘बदामी डोक्याचा राघू’ यांचेही अतिशय सुरेख फोटो मिळाले आहेत. त्यांच्या रंगरूपातील फरक तुम्हालाही जाणवतील.