
सामना प्रतिनिधी । कराड
कराड तालुक्यातील शेणोली येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी गोळीबार करत 22 लाख रुपये व दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. सोमवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी महाराष्ट्र बँकेच्या शेणोली शाखेचे कामकाज नियमित सुरू होते. दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बँकेतील कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक दोन चारचाकी वाहनांमधून आलेल्या चौघांनी हातात पिस्तुल घेऊन बँकेत प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच भिंतीवर गोळीबार करत भीती दाखवली. तसेच दरोडेखोरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व ग्राहकांना बँकेतील सेफ रूममध्ये कोंडून घातले. त्यानंतर दरोडेखोरांनी कॅश कॅबिन व स्ट्राँग रूम मधील सुमारे 22 लाख रुपयांची रोख रक्कम व दहा तोळे सोन्याचे दागिने पोत्यामध्ये भरून तेथून पोबारा केला. जात असताना दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांची व ग्राहकांचे 5 मोबाईल घेऊन गेले.
भर दुपारी बँकेवर पडलेल्या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.




























































