
सामना प्रतिनिधी, खेड
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आणि 2019च्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघांचे अधिकृत उमेदवार अद्यापि जाहीर झाले नसले तरी संभाव्य उमेदवारांनी याआधीच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. गतवेळच्या निवडणुकीत अपयश आलेले उमेदवार आपले कुठे काय चुकले याचा कानोसा घेत आहेत, तर गतवेळच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीत पुन्हा विजयश्री खेचून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गतवेळच्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली होती. शिवसेनेकडून अनंत गीते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे तर शेतकरी कामगार पक्षाकडून रमेश कदम हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या तिन्ही उमेदवारांनी निवडून येण्यासाठी पुरी ताकद पणाला लावली होती. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरेच रायगडाला तोरण बांधणार असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होता. मात्र शेवटच्या क्षणाला मतदारांनी तो आत्मविश्वास फाजील ठरवला आणि शिवसेनेचा भगवाच रायगडावर डौलाने फडकला होता. रायगडाला तोरण बांधण्याचा बहुमान शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनाच मिळाला होता.
पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तोच रणसंग्राम रायगड मतदारसंघात रंगणार आहे. अधिकृत उमेदवार अद्यापि जाहीर झाले नसले तरी शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे एकमेकाच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. गतवेळच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या शेकाप पक्षाने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली असल्याने यावेळी निवडणुकीच्या रिंगणात गीते विरुद्ध तटकरे असणार आहेत.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले आहेत. दोन्ही उमेदवारांचे गावनिहाय मेळावे. मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. यातून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे अजमावण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवातही झाली आहे. मात्र सद्यस्थितीत त्याची तीव्रता फार कमी आहे. रविवारी निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा कमालीचा वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील राजकीय वातावरणातील उष्माही तितकाच वाढलेला असेल हे निश्चित मानले जात आहे.























































