
सामना प्रतिनिधी । संगमनेर
काँग्रेस पक्षाकडून हवं ते मिळत असतांनाही पक्ष सोडून भाजपमध्ये जाणे या मागे बालहट्ट आहे कि काही राजकीय स्ट्रॅटजी आहे. असा सवाल करीत विखे परिवाराचा मागील अनुभव पहाता या मागचे नेमके धोरण स्पष होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप मधे प्रवेश केल्या नंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता विखेंच्या भूमिकेचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच विखेंनी शिवसेनेला धोका दिला असेही थोरात यांनी म्हटले.
थोरात म्हणाले की, “वास्तविक पहाता काँग्रेस पक्षाने विखे परिवाराला गेल्या पन्नास वर्षांपासुन मागेल ती सत्तेची पदे दिली. त्यावरच संस्था उभ्या राहिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष,विरोधीपक्ष नेते, युवक काँग्रेसची पदे असतांनाही पक्ष सोडला जातो ही कृती ठरल्या प्रमाणे स्ट्रॅटजी असावी. या पुर्वीही विखे पिता पुत्र शिवसेनेत गेले होते. शिवसेनेनेही त्यांना मंत्रीपदेही दिली. मात्र शिवसेनेलाही फसवून विखेंनी आपला रंग दाखवला. विरोधी पक्ष नेते पद असतांनाही मागील पाच वर्षाच्या काळात विखेंनी फक्त शिवसेनेवर टीका केली यातूनच त्यांची भाजपची जवळीक समजून येते. “प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षात जाऊन फायदे उठवायचे हेच विखेंचे राजकारण असल्याचे थोरात यांनी म्हटले
राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात जातील किंवा नाही यावर बोलतांना आमदार थोरात म्हणाले की, मागील अनुभव पहाता या मागे मुलाचा बालहट्ट कि काही निश्चीत धोरण आहे ? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

























































