
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर गेली पाच वर्षे दर महिन्याला प्रसारित केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे श्रोते घटले आहेत, अशी कबुली माहिती अधिकाराखाली ‘ऑल इंडिया रेडिओ’नेच दिली आहे.
मोदी यांच्या ‘मन की बात’च्या श्रोत्यांच्या संख्येबाबत दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते युसूफ नकवी यांनी ऑल इंडिया रेडिओकडे माहिती अधिकाराखाली विचारणा केली होती. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दर महिन्याला केलेल्या भाषणाचा श्रोतृवर्ग शहरी आणि ग्रामीण भागात झपाटय़ाने घटत गेला, असे उत्तरादाखल ‘आकाशवाणी’ने सांगितले आहे. पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 पासून सुरू करण्यात आला होता. त्याचे भाषण हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित व्हायचे. मात्र मोदींच्या या कार्यक्रमाला रेडिओच्या एकूण श्रोत्यांपैकी केवळ 20 ते 30 टक्केच श्रोते देशभरात ऐकत असत, असे ‘ऑल इंडिया रेडिओ’ने दिलेल्या माहितीतून उजेडात आले आहे.

























































