भाजपच नाही तर ‘हे’ आहेत काँग्रेसचे कट्टर विरोधक, बालेकिल्ल्यात उमेदवार देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sonia-and-rahul

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेस यांच्यात टक्कर असली तरी उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी अडचण वाढली आहे. इथे भाजपच नाही तर बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाचे गटबंधन काँग्रेसची डोकेदुखी ठरणार आहे.  बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा काँग्रेस विरोध अधिक तीव्र केला आहे. आगामी लोकसाभा निवडणुकीसाठी सप-बसपने काँग्रेससाठी सोडलेल्या अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातही आपले उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत या मुद्यासह एकत्रित प्रचार करण्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

मायावती यांनी काँग्रेससोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत उत्तर प्रदेशात सप व बसप अनुक्रमे 37 आणि 38 जागांवर निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात आपले उमेदवार न उतरवण्याचा निर्णय बसप-सप आघाडीने घेतला होता. मात्र जसजसे राजकीय वातावरण तापत आहे त्यासोबतच मायावती आणि काँग्रेसमधील संबंध देखील अधीक ताणले जाताना दिसत आहेत. त्यातच प्रियंका गांधी यांनी रुग्णालयात जाऊन भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतल्यामुळे मायावतींचा पारा आणखीनच चढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मायावती आणि अखिलेश यादव यांच्यात बुधवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत अमेठी व रायबरेलीमधून देखील उमेदवार रिंगणात उतरवण्याबाबत दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.