
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
उन्हाचा चटका वाढताच पाणीटंचाईची भीषणताही वाढत असून, मराठवाड्यातील अनेक गावांच्या घशाला कोरड पडली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ सुरू करण्यात आलेल्या टँकरची संख्या दीड हजारावर गेली असताना दरदिवशी या टँकरवर अवलंबून असणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.
मराठवाड्यात आलेली थंडीची लाट ओसरताच उन्हाची तीव्रता जाणवायला सुरुवात झाली होती. तीन-चार दिवसांपासून उन्हाचा चटकाही वाढला असल्याने जीव पाणी पाणी करीत आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने आता प्रशासनाचा कस लागणार आहे. दरदिवशी टँकरवर अवलंबून असणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत असून, ८ मार्चपर्यंत टँकरवर तहान भागविणाऱ्या २७ हजार ३० हजार ५७२ जणांमध्ये तीन दिवसांत तब्बल ४३ हजार ९६२ जणांची भर पडली आहे. प्रशासनाकडूनही त्यानुसार टँकरची संख्या वाढविण्यात येत असल्याने या तीन दिवसांत १५ टँकर वाढविण्यात आल्याने सध्या टँकरची संख्या १ हजार ६०९ वर पोहचली आहे. ही संख्या वाढत असल्याने विहिरींचे अधिग्रहणही वाढविण्यात आले आहे. प्रशासनाने आणखी १७ विहिरी ताब्यात घेतल्याने ही संख्या ७९६ पर्यंत गेली आहे. मार्च महिन्यात ही परिस्थिती असल्याने पुढील अडीच महिन्यांत निर्माण होणारी परिस्थिती किती गंभीर राहील, हे या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
एप्रिलनंतर अनेक गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी पुढील दिवसांत गरजेइतके पाणी या गावांना उपलब्ध होणार का, असा प्रश्न आहे. हे पाणी उपलब्ध न झाल्यास संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ५४८ गावे आणि २१९ वाड्या असे ७६७ गावांना ७८८ टँकरने पाणी पुरविले जात आहे. जालना जिल्ह्यात २३७ गावे, ४२ वाड्यांसाठी २९१, बीड जिल्ह्यात ३९७ गावे, १७५ वाड्यांना ५०७, धाराशिव जिल्ह्यातील ४१ गावांना ५४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सध्या या टंचाईची तीव्रता कमी आहे. येणाऱ्या दिवसांत या जिल्ह्यातही पाण्यासाठी टाहो फोडला जाण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून पाणीटंचाई असलेल्या गावांची संख्या आणि तेथे सुरू करण्यात आलेले टँकर यांची आकडेमोड केली जात असली, तरी हे टँकर त्या गावात पाणी पोहचवितात किंवा नाही, यावर काटेकोरपणे नियंत्रण नसल्याने टँकरचा आकडा फुगविला जात असण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या १ हजार ६९६ पैकी तब्बल १ हजार ६२४ टँकर खासगी आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडून एक फेरी करून तीन ते चार फेऱ्या दाखविल्या जात असल्याचीही शक्यता आहे. दुष्काळामुळे मराठवाडा होरपळून निघत असला, तरी खासगी टँकरवाल्यांची मात्र चांदी होत आहे.

























































