
>> मल्हार कृष्ण गोखले
पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश या पंच महाभूतांनी सारे विश्व व्यापलेले आहे, बनलेले आहे. पंच महाभूतांशिवाय विश्वाला अस्तित्वच नाही.
अगदी अशीच स्थिती आज कॉम्प्युटर या वस्तूची झालेली आहे. त्याच्याशिवाय मानवी व्यवहारांना अस्तित्वच उरणार नाही, इतके आज सगळे मानवी व्यवहार कॉम्प्युटरने व्यापून टाकले आहेत. म्हणून प्रस्तुत आत्मकथेला लेखक-लेखिकेने नाव दिलंय ‘सहावं महाभूत आणि मी.’
1970 च्या दशकात जेव्हा तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना कॉम्प्युटर तर सोडाच साधा कॅल्क्युलेटर हीसुद्धा अपूर्वाई होती, तेव्हा सतीश जोशी या विद्यार्थ्याने कॉम्प्युटर सायन्स हा विषय निवडला. सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या सतीशच्या पालकांना, नातेवाईकांना प्रश्नच पडला की, हा अनोळखी विषय घेऊन पुढे आपल्या पोराला नोकरी कशी मिळणार? त्याला काय भवितव्य असणार? तेव्हाच्या अगदी सुशिक्षित आणि इंग्रजी वैज्ञानिक कादंबऱया वगैरे वाचणाऱया लोकांनाही एवढेच माहीत होते की, कॉम्प्युटर नावाचे एक अतिशय अत्याधुनिक यंत्र पाश्चिमात्य देशांमध्ये बनले आहे आणि एक कॉम्प्युटर यंत्र साधारण एका खोलीएवढे अवाढव्य असते. 1980 साली पवईच्या आयआयटीमधून सतीश जोशी कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.टेक. झाला तेव्हाही हीच स्थिती होती.
पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्स किंवा आजच्या भाषेत पी.सी.एस. ही हिंदुस्थानातल्या कॉम्प्युटर उद्योग क्षेत्रातली एक नामवंत कंपनी. सतीश जोशी आणि त्याच्यासारखे मूठभर तरुण इंजिनीअर्स या मंडळींनी पी.सी.एस.च्या माध्यमातून आपल्या देशातल्या संगणक क्षेत्राचा पाया कसा घातला आणि ही विस्तारती क्षितिजे आणखी विस्तृत कशी केली, याची कहाणी म्हणजेच प्रस्तुत पुस्तक ‘सहावं महाभूत आणि मी.’
पाश्चिमात्य गोरे लोक हे आपण फार सहिष्णू, उदारमतवादी, लोकशाहीवादी आहोत असा वरवर देखावा करीत असतात. प्रत्यक्षात त्यांना आपल्या वर्णाचा भयंकर अहंकार असतो. गौरेतर सगळय़ांनाच ते तुच्छ समजतात. हिंदुस्थान हा वाघांचा, सापांचा, जादुगारांचा आणि नागडय़ा बैराग्यांचा देश आहे, हे इंग्रजी लेखकांचे विधान वर्णश्रेष्ठत्वाच्या या अहंगंडातूनच येते. पण आता हिंदुस्थान हा आय.टी. तज्ञांचा देश आहे हे आपल्या तरुणांनी इतक्या निखालसपणे सिद्ध केले आहे की, जगाला ते मान्य करावेच लागले आहे. या उपलब्धीतला एक सहभागी आणि या प्रवासाचा एक साक्षीदार म्हणून सतीश जोशीची आणि एकंदरीतच पी.सी.एस.ची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. प्रस्तुत आत्मकथनात स्वतः सतीश आणि सहलेखिका शोभा बोंद्रे यांनी ती अतिशय रोचकतेने शब्दांकित केली आहे.
1980 नंतर जागतिक संगणक क्षेत्रातही क्रांतिकारी बदल झाले. कॉम्प्युटरचा अवाढव्य आकार झपाटय़ाने लहान होत गेला. स्टीव्ह जॉब्सच्या ‘ऍपल’ने आणि बिल गेटस्च्या ‘विंडोज’ने ‘पर्सनल कॉम्प्युटर -पी.सी.’ बनवून त्याला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. आपल्या देशाच्या संदर्भात 1985 साली पहिली क्रांती झाली. प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या राजीव गांधींनी कामगार संघटनांचा विरोध फाटय़ावर मारून संगणक युगाची सुरुवात केली. तर 1991 साली नरसिंह राव सरकारने पंडित नेहरूप्रणित अर्थकारण पूर्ण बदलून जागतिकीकरण सुरू केले. हिंदुस्थानातील संगणक युगासाठी या दोन घटना फार महत्त्वपूर्ण होत्या.
का, कोण जाणे, पण लेखक-लेखिकेने जगातल्या व आपल्या देशातल्या वरील थारेपालटी घटनांचा विस्तृत आढावा घेतलेला नाही. कदाचित त्यांना किंवा प्रकाशकाला ठरावीक पृष्ठांची मर्यादा असेल. पण नव्या पिढीला 1980 पूर्वी जागतिक आणि हिंदुस्थानी संगणक क्षेत्रात नेमकी काय परिस्थिती होती हे कळण्यासाठी हा आढावा आवश्यक होता.
एकंदरीत पुस्तक अतिशय वाचनीय. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ मॅजेस्टिकची एकंदर निर्मिती दर्जेदार आहे.
सहावं महाभूत आणि मी
लेखक – शोभा बोंद्रे, सतीश जोशी
प्रकाशन – मॅजेस्टिक प्रकाशन
पृष्ठ – 173, किंमत – 220 रुपये






























































