
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा आज शून्यावर पोहचणार आहे. धरण 110 टक्के भरुन देखील केवळ पाणी वाटपाच्या नियोजनात विस्कळीतपणा असल्याने अपेक्षेपूर्वी धरणाची पातळी मृतसाठ्यात पोहचली.
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात 38 टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत चिंत्तेचे वातावरण होते मात्र उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने हायसे वाटले होते. मात्र पाणी वाटपाचे नियोजन फसल्याने धरणाची पाणी पातळी मार्चच्या मध्यावर संपली आहे. उजनी धरणातील उपयुक्त 100 टक्के पाणी साठा संपून पातळी मृत साठ्यातील वजा 100 टक्के कडे मोजण्यास आज पासून सुरवात होईल.
मृत साठ्यातील पाणी साठपाण्याचे नियोजन अचूक करणे गरजे आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिराने होते तोवर धरणातील पाणी शिल्लक ठेवण्याची कसरत आहे.
उजनी धरणात शनिवारी सकाळी 0.33 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता मात्र दुपारी चार वाजता हा साठा शून्यावर आला. सध्या धरणातून 3200 क्युसेक पाणी हे कॅनॉलमध्ये सोडले जात आहे. याच बरोबर बोगद्यात 650 क्युसेकचा विसर्ग आहे. उजनीच्या मृतसाठ्यात जवळपास 63 टीएमसी (1802 दलघमी) पाणी आहे. या प्रकल्पात उपयुक्त साठा हा मृतसाठ्यापेक्षा कमी आहे.

























































