राज्य सरकारची 29 हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य सरकारने राज्याच्या वेगवेगळय़ा खात्यात तब्बल 29 हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे 13 हजार पदे ग्रामविकास विभागातील आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जलसंपदा विभागातील तसेच पोलीस दलातील सात हजार पदांची भरती सुरू होईल.

राज्याच्या वेगवेगळय़ा खात्यामध्ये सुमारे 1 लाख 20 हजार पदे रिक्त आहेत. मध्यंतरी 70 हजार पदांची मेगाभरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागातील 5 हजार 780 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या दोन खात्यांत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. राज्यात 80 हजार पदांची भरती होणार आहे. त्यापैकी 35 हजार पदांची भरती पहिल्या टप्प्यात होणार आहे.

पशुविकास, जलसंवर्धन व वैद्यकीय शिक्षण विभागातील नोकरभरतीसाठी मागील डिसेंबर व यंदाच्या जानेवारी महिन्यात जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात 877 वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागात 405 अभियंते, जलसंवर्धन विभागात 300 अभियंते, वन विभागात दोन हजार रक्षक, 960 ऑडिट असिस्टंट व निरीक्षक आणि महसूल विभागात सुमारे 1800 तलाठ्यांच्या पदांच्या भरतीचा समावेश आहे. ग्रामविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता इतर खात्यांमधील भरतीसाठी लाखो अर्ज आले. प्रशासकीय विलंबामुळे गृह व जलसंधारण विभागातील सहा हजार पदांच्या भरतीची व जलसंपदा विभागातील सुमारे 900 पदांच्या भरतीची जाहिरात लोकसभा निवडणुकीनंतर प्रसिद्ध होईल. या मेगाभरतीमुळे राज्यातील असंख्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.